देवरुख :
देवरुख- मार्लेश्वर मार्गावरील मारळ येथे रस्त्याला पडलेला भला मोठा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. याकडे बांधकाम विभाग, देवस्थान ट्रस्टी यांनी लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी भक्तगण, पर्यटकांमधून होत आहे.
महादेवाच्या दर्शनासाठी तसेच नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी भाविक, पर्यटकांची पावले तीर्थक्षेत्री वळू लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी मारळ ते मार्लेश्वर या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले.
जानेवारी महिन्यात तीर्थक्षेत्री मकरसंक्रांतीला आंगवलीचा देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजा देवी यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. यात्रेपूर्वी दोन दिवस अगोदर ठेकेदाराने खडबडून जागे होत मारळ येथील मोरीवर अर्धवट राहिलेल्या कामावर डांबरीकरणाचा साज चढविला. याचदरम्यान वाहनांची देखील ये-जा सुरू होती. वाहने थांबविणे देखील अशक्य होते. वास्तविक हे काम यापूर्वीच करणे गरजेचे होते. परिणामी सध्या मोरीवर डांबरीकरण वाहून जात पुन्हा खड्याचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने भाविक, पर्यटकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. दोन दिवसांपूर्वी या खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाला.
सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या मार्गावरील मारळ येथील खड्डा त्रासदायक ठरत आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकडे संबंधित ठेकेदार, मारळ ग्रामपंचायत, बांधकाम विभाग, देवस्थान ट्रस्टी यांनी तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
- तीर्थक्षेत्री कचऱ्याचे साम्राज्य
मार्लेश्वर देवस्थान पायथा ते मंदिरापर्यंत दुतर्फा दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच येणाऱ्या पर्यटकांमुळे कचरा होत आहे. परिणामी विद्रुपीकरणात भर पडत आहे. व्यापाऱ्यांनी थेट दुकानाच्या बाहेर दरीत कचरा फेकून दिल्याचे चित्र आहे. साफसफाईकडे व्यापारी, देवस्थानने लक्ष देणे गरजेचे आहे. नियोजनाचा अभाव याठिकाणी दिसून येत आहे.








