संकेश्वर पोलिसांची कारवाई : निपाणीतील चौघांचा समावेश : मिरज येथील एक : हिंडलगा कारागृहात रवानगी
संकेश्वर : शिप्पूर (ता. हुक्केरी) हद्दीतील 2 एकर 30 गुंठे जमीन आपल्या नावे असल्याचे भासवून त्या जमिनीची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परिणामी या जमिनीसाठी ग्राहक शोधून त्यांच्याकडील 25 लाख रुपये आगाऊ घेऊन खरेदीला टाळाटाळ केली जात होती. या प्रकाराचा मूळ मालकाला सुगावा लागताच या फसवणूक प्रकरणाची फिर्याद संकेश्वर पोलिसात देण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावून मुख्य सूत्रधारासह 5 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. अशरफ मकबूल सनदी (रा. मिरज), शैलेश संभाजी बोदले, मुदाफीर रियाजअहमद शेख, आण्णासाहेब वसंत भोसले व गजानन किल्लेदार (सर्व रा. निपाणी) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.
या घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, सुधीरकुमार सालीयान रा. बेळगाव यांच्या मालकीची शिप्पूर हद्दीत 2 एकर 30 गुंठे जमीन आहे. सदर जमीन आरोपी अशरफ मकबूल सनदी याने सुधीरकुमार सालीयान आपणच असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली होती. मुदाफीर हा अशरफचे नाव धारण करून एजंट असल्याचे भासवून या देघांनी मालक व एजंट अशी भूमिका वटवून संकेश्वर येथील बस्तवाडी नामक व्यक्तीला गाठून कमी किमतीत जमीन आहे, ही जमीन विक्री करत आहोत, असे सांगितले. बस्तवाडी यांनी सदर जमिनीची पाहणी करून व कमी किमतीत मिळत असल्यामुळे जमीन घेण्याचे ठरवून 25 लाख रुपये आगाऊ अशरफ व मुदाफीर यांच्याकडे दिले. काही दिवसांनंतर जमिनीची खरेदी करण्यासाठी बस्तवाडी यांनी प्रयत्न सुरू केले. पण अशरफ व मुदाफीर यांनी खरेदी कामासाठी टाळाटाळ सुरू केली.
बस्तवाडी यांनी सदर जमिनीत कूपनलिका खोदण्यासाठी प्रयत्न सुरू केला. याचवेळी शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बस्तवाडी यांना आपण ही जमीन खरेदी केला का? अशी विचारणा केली. बस्तवाडी यांचा होकार येताच त्या शेतकऱ्यांनी सालीयान यांच्याशी फोनद्वारे जमीन विक्री केल्याची चौकशी केली. यावर सालीयान यांनी आपण जमीन विक्री केली नसल्याचे स्पष्ट केले. याचवेळी जमिनीचे मूळ मालक सुधीरकुमार सालीयान व बस्तवाडी यांची चर्चा होताच जमिनीच्या विक्री प्र्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावर सालीयान यांनी संकेश्वर पोलिसात फसवणूक प्रकरणी फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक एस. एम. आवजी यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता बनावट कागदपत्रे तयार करून सदर जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे कबुलीतून स्पष्ट केले. सदर 5 जणांवर गुन्हा दाखल करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली. या प्रकरणात आणखी काहीजण सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस. एम. आवजी यांनी दिली.
सावधान…कागदपत्रे तपासा
जमीन खरेदी-विक्रीची प्र्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली असून हा एक व्यवसाय बनला आहे. मात्र या प्रकरणात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. फसवणूक टाळण्यासाठी जमीन मालकांनी आपल्या जमिनीची कागदपत्रे वारंवार तपासणी करून घ्यावीत व ती सुरक्षित आहेत की नाही याची पाहणी करावी, असे आवाहनही सीपीआय आवजी यांनी केले आहे.









