मिळकतधारकांना विनाकारण हेलपाटे मारण्याची वेळ : मनपातील कारभार सुधारण्याची गरज
बेळगाव : शहरातील मिळकतींची ई-आस्थी अंतर्गत नोंदणी करून घेऊन संबंधितांना ए व बी खात्यांचे वितरण केले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ई-आस्थी नोंदणी करण्यासाठी गेलेल्यांना अनेक कटू अनुभव आल्याचे पाहावयास मिळत आहेत. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे सांगत मिळकत धारकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याने ई-आस्थी नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ मिळकत धारकांवर आली आहे. यापूर्वी महानगरपालिकेकडून अधिकृत मिळकतींची नोंद करून घेऊन त्यांना ए खात्याचे वितरण केले जात होते. मात्र अलीकडे अनधिकृत मिळकतींची देखील ई-आस्थी अंतर्गत नोंदणी करून घेऊन बी खाता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ज्या मिळकतींची उपनोंदणी कार्यालयात नोंद आहे त्यांना बी खाता दिला जात आहे. सुरुवातीला ही मोहीम जोरात राबविण्यात आली. मात्र अलीकडे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे.
एजंटांचा सुळसुळाट
महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये ई-आस्थी नोंदणी करून घेऊन मिळकत धारकांना खात्याचे वितरण केले जात होते. अशोकनगर, कोनवाळ गल्ली आणि गोवावेस येथील विभागीय कार्यालयांध्ये ही व्यवस्था सुरू करण्यात आली होती. त्याठिकाणी ई-आस्थी नोंदणीसाठी गेलेल्यांना विनाकारण विलंब लावण्याबरोबरच एजंटांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे यात सुधारणा व्हावी यासाठी महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी विभागीय कार्यालयांना अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी अनागोंदी कारभार सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मनपा आयुक्तांनी अशोकनगर आणि कोनवाळ गल्ली येथील विभागीय कार्यालयात अर्ज स्वीकारणे बंद केले.
ई-आस्थीच्या फायली पडून : निपटारा करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
गेल्या काही दिवसांपासून सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयात सिंगल विंडो व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी अर्ज स्वीकारले जात आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यापासून लोकांच्या ई-आस्थीच्या फायली तशाच पडून आहेत. मात्र त्यांचा निपटारा करण्याकडे अधिकाऱ्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. पहिल्या अर्जकर्त्यांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे असताना ज्या फायली एजंटांमार्फत येत आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा कारभार महापालिकेत सुरू आहे.
अधिकाऱ्यांचा जाणूनबुजून चालढकलपणा
नगरसेवकांकरवी गेलेल्या फायलींचा देखील लवकर निपटारा होत नसल्याची ओरड आहे. काही अधिकाऱ्यांनी एजंटांचे साटेलोटे झाले असल्याने सर्वसामान्य जनतेची कामे करून देण्यास अधिकारी जाणूनबुजून चालढकल करीत आहेत. जे मिळकतदार स्वत: महापालिकेत जाऊन अर्ज करत आहेत त्यांच्या फाईलमध्ये अधिकारी कागदपत्रांच्या त्रुटी असल्याचे सांगून माघारी धाडत आहेत.
भोंगळ कारभार थांबविण्यासाठी आयुक्तांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे
वेगवेगळ्या कार्यालयांच्या चकरा मारून कागदपत्रे गोळा करताना मिळकतधारकांची दमछाक होत आहे. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार थांबविण्यासाठी मनपा आयुक्तांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे बनले आहे. सध्याची परिस्थिती पाहता ई-आस्थी नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ बेळगावकरांवर आली आहे.









