चिपळूण :
दोन महिन्यांपूर्वी नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला असला तरी तेवढेच अतिक्रमण पुन्हा उभे राहिले आहे. असे असताना राजकीय दबावामुळे नगर परिषदेचीही कारवाई थंडावली आहे मध्यवर्ती बसस्थानक परिसर, मोगाळे, चिंचनाका, पानगल्ली येथे छप्परे उभी राहिल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाढणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहराला अतिक्रमणाचा शाप लागला आहे. यामुळे वाहतूक कोंडीच्या विळख्यात शहर गुदमरत आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, भोगाळे, चिंचनाका, कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, जुने बसस्थानक, माजी मंडई, बाजारपेठ, पानगल्ली, बहादूरशेखनाका, पॉवरहाऊस, गोवळकोटरोड ही अतिक्रमण होणारी मुख्य ठिकाणे आहेत.
अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी या सर्व भागातील अतिक्रमणावर नगर परिषदेने जेसीबी फिरवला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच गोवळकोट रोडवरील अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले. एवढेच नव्हेतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून अतिक्रमणविरोधी पथकही तयार करण्यात आले. त्यामुळे शहर मोकळे दिसून येत होते. कारवाईच्या भीतीने कोणी छप्परेही उभारत नव्हते.
- राजकीय दबाव
असे असताना नजीकच्याकाळात नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे अतिक्रमणावरील कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असले तरी लोकप्रतिनिधी मात्र सुरुवातीपासून व्यावसायिकांना छुपा पाठिंबा देत होते. यातूनच अधिकाऱ्यांवर राजकीय मोठा दबाव येत होता मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते. आता पावसाचे कारण देत हा दबाव वाढल्याने नगर परिषदेची कारवाई थंडावली आहे. यातूनच पुन्हा सर्व जागांवर छप्पर उभारून दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यासाठी गटारांच्या बाजूने मातीचा मराव करण्यात आला असून काहींनी गटारांवर लेंटर टाकले आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्वीप्रमाणे झाली असून अतिक्रमण कारवाईवर झालेला खर्च, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ वाया गेला आहे. सुरुवातीपासून अतिक्रमणावरील कारवाई थांबता थांबत नव्हती. त्यामुळे अनेकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी खासगी जागा भाड्याने घेत तेथे व्यवसाय सुरू केले आहेत. असे असताना आता अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने ९० टक्के व्यावसायिक मूळजागी आले आहेत. त्यामुळे ज्यांनी जागा भाड्याने घेतल्या आहेत त्यांच्यावर हा अन्यायच असल्याच्या प्रतिक्रिया येथे उमटत आहेत.
- काही मागे, काही मूळजागी
सध्या जे अतिक्रमण केले जात आहे. त्यातील बहुतांशी व्यावसायिकांनी रस्त्यापासून लांब आपली दुकाने थाटली आहेत. तर काहींनी मूळजागी रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय सुरू केला आहे.
- कारवाई अद्याप थांबलेली नाहीः विशाल भोसले
शहरात वाहतूककोंडी होऊन वाहनचालक, नागरिक यांना त्रास होऊ नये म्हणून अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई थांबलेली नाही. कोणीही पुन्हा अतिक्रमण करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी विशाल मोसले यांनी दिला आहे.
- पुन्हा तेच…
पावसाचे कारण देत दबाव वाढला
सुमारे ९० टक्के व्यावसायिक मूळ जागी








