खेड / राजू चव्हाण :
खेड रेल्वेस्थानक परिसरातील सुशोभिकरणाला पहिल्याच मुसळधार पावसात लागलेल्या गळतीने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हच उभे ठाकले आहेत. तसेच रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचाही पुरता फज्जा उडाला असून चार ठिकाणी भर पावसातच ‘ठिगळं लावण्याची नामुष्की ठेकेदारावर ओढवली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित करण्यात आलेल्या रेल्वेस्थानक सुशोभिकरणाच्या कामाचे तीनतेरा वाजलेले असतानाच रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामाचाही पुरता फज्जा उडाला आहे. काँक्रिटीकरण कामात पुन्हा खोदाई करून नव्याने कॉक्रिटीकरण करण्यात आले. अन्य तीन ठिकाणीही भर पावसातच काँक्रिटीकरणाचे सोपस्कार पूर्ण झाले. यामुळे कोट्यवधींच्या निधीवर ‘पाणी’ फेरल्याचा सूर आळवला जात आहे. सुशोभिकरणासह रस्ता काँक्रिटीकरण कामादरम्यान येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंता जातीनिशी उपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्या देखरेखीखाली काम झालेले असतानाही पहिल्याच पावसात कामाची पोलखोल झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित होत आहे.
रेल्वेस्थानक परिसरातील सुशोभिकरण अन् रस्ता काँक्रिटीकरण कामाचे यापूर्वीच मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी वाभाडे काढत येथील सार्वजनिक बांधकाम खात्यावर टीकास्त्र सोडले होते.
हा अपवाद वगळता अन्य राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवण्यातच धन्यता मानली आहे.
- .. तर अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही !
रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण आणि कॉक्रिटीकरण कामावर कोट्यवधी रुपये खर्चुनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निधी पाण्यातच मुरला आहे. परिसरात सर्वत्र झिरपणाऱ्या पाण्यामुळे नेमके जायचे कुठून अन् यायचे कुठून, असा प्रश्न उभा ठाकतो. बेशिस्त पार्किंगच्या गराड्यामुळे बकालपणा प्राप्त झाला आहे. या कामात व्यवस्थितपणा आणला न गेल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही.
– वैभव खेडेकर, मनसे राज्य सरचिटणीस








