मिरची पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी : खानापूर म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बंदुका गेल्या दीड वर्षापासून पोलीस ठाण्यात जमा आहेत. त्या परत कराव्यात, तसेच तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बेळगाव येथे जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांची भेट घेऊन देण्यात आले. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, गोपाळ पाटील, भिमसेन करंबळकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील पीक संरक्षणसाठी घेतलेल्या बंदुका खासदार निवडणुकीच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.
मात्र या बंदुका पुन्हा परत देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक संरक्षण करणे कठीण झाले आहे. पोलीस ठाण्यात जमा असलेल्या बंदुका परवान्याचे निमित्त करून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. यासाठी तातडीने शेतकऱ्यांच्या बंदुका परत देण्यात याव्यात. तसेच तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरची (गिड्डी मिरची) पीक घेण्यात येते. यावर्षी गेल्या महिन्याभरात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने मिरची पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क साधून तातडीने बंदुका परत देण्याची सोय करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. यावेळी समिती कार्यकर्ते बाळासाहेब शेलार, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, राजाराम गावडे, रविंद्र देसाई, अरुण देसाई, धनंजय देसाई, कल्लाप्पा घाडी, अशोक देसाई, मुकुंद पाटील, नितीन देसाई, खंडेराव देसाईसह समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









