रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील उमेदच्या महिला प्रभागसंघांना देण्यात आलेल्या हाऊसबोट आता पावसाळी वातावरणात किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कोतवडे आणि वाटद प्रभागांना देण्यात आलेल्या हाऊसबोट तवसाळ खाडी किनाऱ्यावर उभ्या करण्यात आल्या आहेत. तर चिपळूण तालुक्यातील मालदोली प्रभागाची बोटही इथल्या खाडीकिनाऱ्यावर उभी करण्यात आली आहे. पावसाळी हंगामानंतर सप्टेंबर महिन्यात हवामानाचा अंदाज घेऊन मगच या हाऊसबोटी पुन्हा पर्यटन व्यवसायासाठी सज्ज होणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर, मंडणगड, राजापूर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यातील बचतगटाच्या महिलांनी आता हाऊसबोट प्रकल्पाचा प्रस्ताव सिंधुरत्न संमृद्धी योजनेतून सादर केला होता. या प्रकल्पाना मंजुरी मिळून जिल्ह्यातील पाच प्रभागसंघाना हाऊसबोटीसाठी प्रत्येकी १ कोटी प्रमाणे ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील जीवनज्योती महिला प्रभागसंघ आणि कोतवडे येथील एकता प्रभागसंघाच्या हाऊसबोटीचे लोकार्पण करण्यात आले.
- सप्टेंबरनंतर पुन्हा सेवेत
वेळेआधीच पावसाने हजेरी लावल्याने आता या तिन्ही हाऊसबोटी आता किनाऱ्यावर सुरक्षितरित्या उभ्या करण्यात आल्या आहेत. पावसाळी हंगामात इतर बोटींप्रमाणेच हाऊसबोटींनाही खाडीत अथवा समुद्रात जाण्यास मनाई असल्याने आता या बोटी खाडी किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात असणारा पाऊस तसेच वेधशाळेचा अंदाज लक्षात घेऊन या बोटी पुन्हा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.








