लाखो लिटर पाणी वाया : दुरुस्तीकडे मनपासह एलअँडटी कंपनीचे दुर्लक्ष
बेळगाव : श्रीनगर येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागली असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे महापालिकेसह एलअँडटी कंपनीने दुर्लक्ष केले असल्याने रहिवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. सततच्या पाण्यामुळे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून बसदेखील ठप्प झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी महानगरपालिकेकडून एलअँडटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे 24 तास योजनेसाठी ठिकठिकाणी नवीन जलवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तशातच शहर व उपनगरात मुख्य जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र गळती काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रीनगर येथे मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असली तरी त्याकडे स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि एलअँडटीने दुर्लक्ष केले असल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.









