कराड :
कराड शहरात वाहतूक कोंडी आणि नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वाहतूक पोलिसांशी वाद घालणे, नियम झुगारून देणे किंवा पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न वाहनचालकांवर भारी पडू शकतो. कारण, कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिसांना आता ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ देण्यात आले आहेत.
पोलिसाच्या शर्टवर लावलेला हा छोटा कॅमेरा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही रेकॉर्ड करतो. वाहनचालक व पोलीस यांच्यात होणारा संवाद प्रत्यक्ष रेकॉर्ड होणार असल्यामुळे कोण चुकीचा आहे, याचा पुरावा उपलब्ध होईल. यातून पारदर्शक आणि निष्पक्ष कारवाई होण्यास मदत होणार आहे.
या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप सूर्यवंशी, उपनिरीक्षक संतोष जगदाळे, राजेंद्र घाडगे, विजय भोईटे यांनी कॅमेरा कसा वापरायचा, याची माहिती दिली. अन्य काही पोलिसांना कॅमेरे देण्यात येतील. त्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले. रविवारी वाहतूक पोलिसांना या कॅमेरांचे वितरण करण्यात आले.
- पार्श्वभूमी काय आहे?
कराडमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यातच अनेक वाहनचालक चुकीच्या पद्धतीने पार्किंग करतात किंवा सिग्नल तोडतात. नियम मोडणाऱ्यांवर जेव्हा वाहतूक पोलीस कारवाई करतात, तेव्हा काही जण हुज्जत घालतात, थेट राजकीय दबाव टाकतात, किंवा प्रसंगी महिला पोलिसांशीही उद्धट वर्तन करतात. काही प्रकरणांमध्ये पोलिसांना बदलीच करण्याची धमकी देण्यात येते.








