सांगली :
पूर्ववैमनस्यातून सांगलीतील युवकाचे अपहरण करून कोल्हापूर रस्त्यावरील टायगर ग्रुपच्या कार्यालयात क्रिकेट स्टम्प, स्टील पाइपने मारहाण केल्याप्रकरणी संशयित रोहित माने, जीवन कांबळे, धनंजय खरात या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली. तिघे सध्या पोलिस कोठडीत असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
फिर्यादी ओम बिनायक पाटील (वय २०, रा. त्रिमूर्ती कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) याने टायगर ग्रुपविरोधात फिर्याद दिली आहे. तो मजुरीचे काम करतो. संशयित जीवन कांबळे आणि ओम यांच्यात सहा महिन्यांपूर्वी काही कारणांवरून वाद झाला होता. त्यामुळे जीवन कांबळे याला राग होता. त्यातूनच बुधवारी रात्री टायगरम ग्रुपच्या रोहित माने आणि एका अनोळखी व्यक्तीने ओम यास घरातून ओढून बाहेर आणले. जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण करून कोल्हापूर रस्त्यावरील टायगर ग्रुपच्या कार्यालयात आणले. तेथे संशयित माने, तेजस कोळेकर, जय बिराजदार, जीवन कांबळे, धनंजय खरात, बबलू ऊर्फ रोहित पाटील व अनोळखी यांनी ओम यास स्टम्प, स्टील पाईपने मारहाण केली. ओम याचा मोबाईल फोडून टाकला.
ओम याने उपचारानंतर गुरुवारी सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रात्री फिर्याद दिली होती. त्यानुसार टायगर ग्रुपमधील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी रोहित माने, जीवन कांबळे, धनंजय खरात या तिघांना अटक केली. इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खाडे यांनी सांगितले.








