विटा / सचिन भादुले :
विटा शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. दोन राज्य महामार्ग विटा शहराला जोडणारे आहेत. जिल्ह्यातील गतीने वाढणाऱ्या शहरात विटा अग्रेसर आहे. मात्र असे असतानाही शहराला रिंगरोड किंवा बायपास रस्ता नाही. सहाजिकच अवजड वाहनांसह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी वाहनांना इच्छा नसतानाही शहरातून प्रवास करावा लागतो. परिणामी वाहतुकीवर ताण येतो. त्यामुळे शहराचा रिंग रोड आणखी किती दिवस नकाशावर राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देश पातळीवर नावाजलेल्या विटा शहरातील रस्ते गेल्या काही वर्षापासून सातत्याने वाहतुक कोंडीच्या गर्तेत अडकलेले दिसतात. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र पालिकेने रिंग रोड अथवा बायपास रस्ता विकसीत केला नाही.
गेल्या दोन विकास योजनेत समावेश असणारा रस्ता आता पक्क्या घरांनी वेढला आहे. त्यामुळे आता त्या नियोजनानुसार रिंगरोड करणे शक्य होणार नाही. सहाजिकच नविन विकास योजनेत सुधारीत रिंग रोडसाठी आरक्षण टाकून ते विकसीत करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच होणार आहे. वास्तविक विटा शहर हे राज्यातील गतीने वाढणाऱ्या शहरापैकी एक आहे. गुहागर-विजापूर आणि सांगली कळवण या राष्ट्रीय महामार्गांचा संगम विट्याच्या छत्रपती शिवाजी चौकात होतो. याशिवाय कुंडल नाक्यावर विटा-मलकापूर आणि नेवरी नाक्यावर विटा-महाबळेश्वर हे दोन राज्य महामार्ग विट्याला मिळतात. हे दोन्ही महामार्ग आणि गुहागर-विजापूर महामार्गाचे काम झाले आहे. सांगली कळवण महामार्गाचे काम बाकी आहे. मात्र या रस्त्यावरून वाढलेली वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातूनच करावी लागत आहे.
- बायपाससाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे
विट्याला बायपास रस्ता करून मिळावा, अशी मागणी आमदार सुहास बाबर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. तासगावला असा बाह्यवळण रस्ता मंजूर झाला. मात्र विटेकर अद्याप प्रतीक्षेत आहेत. साहजिकच या रस्त्यावरून येणारी अवजड वाहने शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. ही बाब नित्याचीच झाली आहे. शिवाय शिवाजी चौकात मोठी वाहने वळताना त्रासदायक आहे
- विटा : विकास आराखड्यात दाखवलेला रिंगरोड अद्याप अस्तित्त्वात आला नाही
शुगर, भारती शुगर, विराज शुगर तर शेजारच्या कडेगाव तालुक्यातील सोनहिरा आणि खटाव तालुक्यातील गोपूज कारखान्याला जाणारी ऊस वाहतुकीची वाहने हंगामात नियमीतपणे याच मार्गाने जातात. सहाजिकच वाहतुकीवर ताण येतो. एकुणच रिंगरोड झाल्यास ही अनावश्यक शहरातून येणारी वाहने बाह्य रस्त्यांनी परस्पर रवाना झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल.
- पार्किंग जागांचा विकास आवश्यक
याशिवाय पालिकेने दोन विकास आराखड्यात पार्किंगसाठी राखीव जागांचा विकास केला नाही. परिणामी शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. सहाजिकच रस्त्यात आडवी वाहने उभी राहिल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे रिंगरोड करणे आणि वाहनतळ विकसीत करण्याला दुसरा पर्याय नाही








