मिरज :
राज्यातील मागासवर्गीय मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या राहण्याची उत्तम सोय व्हावी, यासाठी थ्री-स्टार हॉटेलसारख्या सुविधा असणारी 125 वस्तीगृहे उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी अंदाज पत्रकात 1200 कोटी ऊपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेल्या घटनेमुळेच आपण प्रारंभी नगरसेवक, आमदार आणि आता मंत्री झालो, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातंर्गत शहरातील रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राऊंडलगत उभारलेल्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह आणि 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह या शंभर विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहूणे म्हणून माजी समाज कल्याणमंत्री आमदार सुरेश खाडे उपस्थित होते. स्वप्नात नसतानाही मी प्रथम नगरसेवक झालो. त्यानंतर आमदार म्हणून मला लोकांनी निवडून दिले. मंत्री पदावर विराजमान आहे. ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या घटनेची किमया आहे, असे म्हणाले.
राज्यातील मागासवर्गीय मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या राहण्याची सोय झाली पाहिजे. याच गोष्टीला समाजकल्याण विभागाने प्राधान्य दिले आहे. समाज घडविण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वी भाडेतत्त्वावर वस्तीगृहे चालविली जायची. घाणीच्या साम्राज्याबरोबर विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसत. त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत असे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पण उभारलेली वस्तीगृहे स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजेत, असे सांगत शहरात उभारलेल्या वस्तीगृहाची स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
समाजकल्याण मंत्री असताना प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व्हावे, यास प्राधान्य देण्यात आले. मिरजेत शंभर मुले आणि शंभर मुलींसाठी अद्ययावत वस्तीगृह उभारले गेले. यानिमित्ताने मुलांच्या राहण्याची चांगली सोय झाली. त्यांना चांगले शिक्षणही मिळावे, हीच राज्य शासनाची भूमिका आहे, असे आमदार सुरेश खाडे म्हणाले. मंत्री झाल्यानंतर तालुक्यात 17 बौद्ध विहार उभारले असल्याचा उल्लेख केला. गरीब समाजासाठी काही तरी करावे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या कामाला मूर्त स्वऊप आले, असेही ते म्हणाले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बार्टीचे महासंचालक सुरेश वारे, सामाजिक न्याय पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचूरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, भाजप पक्ष निरीक्षक काकासाहेब धामणे, गणेश माळी, निरंजन आवटी, संदीप आवटी, बेडग सरपंच उमेश पाटील, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.








