चिपळूण :
चिपळूण–कराड मार्गावरील खेर्डी येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या 12 टायर ट्रकच्या चाकाखाली आलेला दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या जखमी दुचाकीस्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली. या अपघातात अन्य दुचाकीस्वारासह एकजण जखमी झाला आहे. या अपघातप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
समीर चंद्रकांत चिवेलकर (29, खेर्डी) असे मयत दुचाकीस्वाराचे तसेच साईराज सावंत, सुनील पवार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. समीर चिवेलकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने शहरातील बहादूरशेख नाक्याहून खेर्डी येथे तर साईराज सावंत व सुनील पवार हे दोघे दुचाकीने बहादूररशेख नाक्याच्या दिशेने जात होते. याचवेळे मालवाहू 12 टायर ट्रक बहादूरशेख नाक्याहून पुढे खेर्डीमार्गे बेळगावच्या दिशेने जात होता. याचदरम्याने दुचाकींची समोरासमोर धडक बसली. दुचाकीवरून कोसळलेला समीर ट्रकच्या चाकाखाली आला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मावळली. रविवारी सकाळी समीरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- आर्किटेक्चर होता समीर
समीर हा व्यवसायाने आर्किटेक्चर होता. त्याने अनेक बांधकामाच्या डिझाईन तयार केल्या आहेत. यातूनच समीरची ओळख निर्माण झाली होती. समीरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.








