कोल्हापूर / संतोष पाटील :
कोल्हापूरच्या राजकारणातील मागील 16 वर्षापासून जय–वीरूची जीवलग जोडी म्हणून प्रसिध्द आहे. गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदाच्या निवडीनंतर यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडेल अशी त्यांच्या राजकीय विरोधकांनी व्यवस्था केली होती. नवीद मुश्रीफ यांना चेअरमन करुन तेल लावलेले हे दोन पैलवान यातूनही सुटले. आतापर्यंत एकमेकाला पुरक राजकारण करणाऱ्या या दोघांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लुटूपूटूची लढाई सोडून एकमेकांविरोधात शड्डू ठोकावा लागणार असल्याने या निवडणुका जय–वीरूच्या दोस्तीची कसोटी पाहणाऱ्या आहेत.
हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी 2009 पासून कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या राजकारणात समझोता एक्सप्रेस सुरु केली. महाडिक गटाला विरोध हा त्यामागील उद्देश होता. या समझोता एक्सप्रेसला आमदार विनय कोरे यांनी वेळोवेळी इंधन पुरवले. महापालिकेच्या आतापर्यंतच्या सर्व निवडणुका हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी स्वतंत्रपणे एकमेकाच्या विरोधात लढवल्या. मात्र हे विरोधाच राजकारण समोरच्या विरोधीपक्षांना गाफील ठेवण्यासाठीच होते. 81 प्रभागातील अनेक सोयीच्या ठिकाणी नुरा कुस्ती रंगत असे. निवडणूक होताच दोघे नेते एकत्र येवून सत्ता स्थापन करत. हाच पायंडा जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हाबँकेच्या राजकारणात होता. ज्याच्या जागा अधिक तो सत्तेतील जादा वाटणी हे समानसुत्र या दोघांनी ठेवले आणि ते शुक्रवारी गोकुळ चेअरमन निवड होईपर्यंत पाळले.
गोकुळ दूध संघात पाच वर्षाच्या चेअरमनकाळाचे पहिले दोन वर्ष सतेज पाटील तर नंतरची दोन वर्ष हसन मुश्रीफ गट त्यांनतर शेवटचे एक वर्ष पुन्हा सतेज पाटील अशी सरळ विभागणी झाली होती. मात्र गोकुळने पहिल्या चार वर्षातच राज्यात तीनवेळा सत्तांतर पाहिली. याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम गोकुळच्या राजकारणावर झाला. तसा तो हसन मुश्रीफ यांची एकहाती हुकूमत असलेल्या जिल्हा बॅंकेतही झाला. गोकुळवर प्रशासक नेमण्याची टांगती तलवार होती. तर जिल्हा बँकेला ईडीने घेरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत हसन मुश्रीफ भाजपचे सहयोगी होताच जिल्हाबँक निसटली. मात्र सतेज पाटील यांच्या राजकाणात गोकुळचा मोठा वाटा असल्याने इथे सत्ताध्रायांची तिरकी नजर कायम होती.
गोकुळच्या ठरलेल्या सत्ता सूत्रांप्रमाणे शेवटचे चेअरमनपद पाटील गटाकडे येणार होते. अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार देत या सर्वांत प्रथम व्टिस्ट आणले. गोकुळचा महायुतीचा चेअरमन व्हावा यासाठी सुत्रे फिरु लागली. अजित पवार यांच्या साथीने हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये पक्षीय राजकारण येणार नाही, यावर ठाम राहून पाटील गटाचे शशिकांत पाटील चुयेकर हे चेअरमनपदाचे नाव निश्चित केले. मात्र, चेअरमन कोणीही करा तो महायुतीचा असावा यासाठी मुश्रीफ यांच्यावर दबाव वाढला. आपल्याच घरात अनेक पदे ठेवल्याने भविष्यातील राजकारण अडचणीचे ठरणार असल्याने नविद मुश्रीफ यांचा विचार होणारच नाही, अशी सत्तेतील विरोधी गटाची अटकळ सतेज पाटील यांनीच फोल ठरवली. आपला नाही तुमचाही चेअरमन होणार नाही, असे ठरवून नविद मुश्रीफ यांच्यानावार शिक्कामोर्तब करुन घेतले. गोकुळच्या राजकारणापासून मुश्रीफ आणि पाटील यांच्या दोस्ताना नावाच्या समझोता एक्सपेसला लाल निशाण मिळण्याची आशाही संपुष्टात आली. येत्या काळात महायुती आणि महाविकास आघाडी असाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सामना रंगणार आहे. यातून हे दोन कोल्हापूरचे कसलेले पैलवान वाट आपल्या आघाडीतील विरोधकांना चितपट कसे करतात ? एकमेकाल पुरक राजकारणाचा डाव न कळता कसे टाकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
- पक्षीय परिघाबाहेर साथ
मेरी जीत तेरी जीत तेरी हार मेरी हार, सुन ऐ मेरे यार, तेरा म मेरा ?म… हे गाणं मुश्रीफ आणि सतेज पाटील जोडीला चपलख बसते. महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री पदावरून दोघांत रस्सीखेच झाली. पण एकमेकाचा आदर राखत दोघांनी जिल्हा प्रशासनाची डोर सांभाळली. ईडीच्या आघात झाला तेव्हा हसन मुश्रीफ यांची जाहीरपणे सतेज पाटील यांनी पाठराखण केली होती. विधानसभा निवडणुकीत विरोधात असूनही दोघांनीही एकमेकाला कसा गुलाल लागेल, याची तजवीज केली होती. पक्षीय परिघाबाहेरच्या जोडण्या घालत, सहकारा व्यतिरिक्तच्या राजकारणात ही जोडी एकमेकाला साथ आणि मदतीचा हात तर देणारच आहे, पण तो कसा हे कोडे निकालानंतरच सुटणार आहे.








