कोल्हापूर :
दहावीनंतर अकरावीला प्रवेश घेवून विद्यार्थी थोडेसे निष्काळजीपणा करतात. काही विद्यार्थी कॉलेजला बंक मारून बाहेर शायनिंग मारत नेतेगिरी करतात. ग्रामीण भागातील काही विद्यार्थी प्रवेश घेतला की थेट परीक्षेलाच हजेरी लावतात. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील विद्यार्थी अकॅडमीला प्रवेश घेवून आठवड्यातून एकदा महाविद्यालयात येवून हजेरी लावत असल्याने अकरावीला जवळपास 60 टक्के विद्यार्थी गैरहजरच राहतात. कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी संख्या वाढीसाठी या विद्यार्थ्यांचे 75 टक्के हजेरी दाखवतात. विद्यार्थ्यांची बेफिकीरी आणि शिक्षण संस्थांच्या चालुगिरीला चाप बसवण्यासाठी शासनाने अकरावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमॅट्रिक पध्दतीने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गतवर्षी कोल्हापूर शहरातील 29 कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान व वाणिज्य इंग्रजी शाखेतील 7 हजार 240 जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतू यापैकी निम्म्या जागा रिक्त राहिल्या, ज्यांनी अकरावीला प्रवेश घेतला त्यापैकी जवळपास 60 टक्के विद्यार्थी नेहमीच गैरहजर राहात असल्याचे निदर्शनास आले.
दहावीतील साचेबंद शिक्षणानंतर कॉलेजमधील मोकळ्या वातावरणात अकरावीला कमी महत्व देत विद्यार्थी स्वच्छंदी जीवन जगतात. दुसरीकडे विज्ञान शाखेतील निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी अकॅडमीला प्रवेश घेवून कनिष्ठ महाविद्यालयाकडे फिरकतही नाहीत. शिक्षण संस्थाही पैशाच्या हव्यासापोटी अकॅडमीबरोबर सामंजस्य करार करतात. अकॅडमीकडून पर विद्यार्थी ठराविक रक्कम शिक्षण संस्थांना दिली जाते. त्यामुळे शिक्षण संस्था या विद्यार्थ्यांची आठवड्यातून एकदा हजेरी घेतात. आता शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक होणार आहे. विद्यार्थ्यांची दररोज वर्गात उपस्थिती असणे गरजेचे आहे.
बायोमेट्रिकमुळे विद्यार्थ्यांच्या पळवाटांनाही चाप बसणार आहे. गतवर्षीपर्यंत प्रवेश घेतला की पुन्हा परीक्षेलाच महाविद्यालयात यायचे. आता मात्र दररोज बायोमेट्रिक हजेरी लाऊन 75 टक्के हजेरी लावणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांसह कनिष्ठ महाविद्यालय प्रशासनाला बायोमेट्रिक हजेरीचा चाप बसणार आहे.
- अकरावीला गैरहजर राहण्याची कारणे
–दहावीनंतर अकरावीला कमी महत्व देत बारावीच्या वार्षिक परीक्षेची तयारी करतात.
–अकरावीच्या गुणांवर पुढील शिक्षण अवलंबून नसल्याने कॉलेजही नापास न करता सरसगट सर्वांना उत्तीर्ण करतात.
–कॉलेजमधील कमी निर्बंधामुळे मोकळ्या वातावरणात स्वच्छंदी जीवन जगतात.
–दहावीनंतर अकरावीला कमी महत्व दिल्याने बारावीचा पायाच कच्चा राहत असल्याने टक्केवारी घसरते.
–दहावीनंतर विद्यार्थी पौगंडावस्था असल्याने शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल होत असल्याने पालकांनी जाणीवपुर्वक लक्ष देण्याची गरज असते.
–दहावीतील गुणांच्या फुगवट्यामुळे 90 टक्के गुण परंतू बारावीत हेच गुण 50 ते 60 टक्केवर येतात.
- यंदा अकरावी शाखानिहाय प्रवेश संख्या
कला : 22050
वाणिज्य : 15670
विज्ञान : 28290
एकूण : 66010
- गतवर्षी शहरातील 29 कनिष्ठ महाविद्यालयातील शाखानिहाय प्रवेश क्षमता
शाखा क्षमता प्रवेश रिक्त जागा गैरहजर विद्यार्थी
वाणिज्य इंग्रजी माध्यम 1280 651 629 400
विज्ञान 3458 3209 2502 2000
एकूण 4109 3809 3131 2500
- अकरावीला बारावीचा पाया मजबूत
अकरावीच्या वर्गात बसले तर बारावीचा पाया मजबूत होतो. त्याचबरोबर नीट आणि सीईटीची तयारी होते. तरीही विद्यार्थी अकरावीच्या वर्गाकडे गांभीर्याने पाहात नाहीत. काही विद्यार्थी घरातून कॉलेजला जातो म्हणून निघतात परंतू कॉलेजला बंक मारून इतरत्र फिरून चिल करतात. यामध्ये दोन्हीकडून नुकसान फक्त विद्यार्थ्याचेच होते. विद्यार्थ्यांकडे पालकांनी जाणीवपुर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
- वर्गात न बसल्याने शैक्षणिक नुकसान
दहावीनंतर कॉलेजला गेले की पहिल्यांदा गोंधळून जाते. परंतू हळूहळू तेथील वातावरणाची सवय होते, विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अकरावीच्या वर्गात बसले पाहिजे. कॉलेजमधील वर्गात न बसल्याने प्रचंड शैक्षणिक नुकसान होते.
श्रुती सावंत (विद्यार्थीनी)
- बायोमेट्रिकमुळे उपस्थिती वाढेल
विद्यार्थ्यांनी अकरावी–बारावी दोन्ही वर्गात उपस्थित राहिले पाहिजे. मोबाईलमुळे विद्यार्थी घरातून आले तरी कॉलेजमध्ये न येता बाहेर फिरतात. त्यामुळे पालकांनी लक्ष देवून विद्यार्थ्यांना अकरावी–बारावीच्या वर्गात दररोज हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात. बायोमेट्रिकमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही दररोज हजर राहून अभ्यासात अपडेट राहतील.
डॉ. गजानन खाडे (मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज)








