कोल्हापूर :
डिजिटल अॅरेस्टची भीती घालून सेवानिवृत्त प्राध्यापिकेस 3 कोटी 57 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून एका 32 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले आहे. फसवणुकीनंतर 42 लाख रुपयांची रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. आणि त्याच दिवशी हि रक्कम दुसऱ्या खात्यावर वळविण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान कोल्हापूर पोलिसांचे पथक त्या तरुणास घेऊन रविवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले असून, त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनी लाँड्रीगच्या खटल्यामध्ये डिजीटल अॅरेस्टची भीती घालून सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे (वय 75, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांना एका टोळीने 3 कोटी 57 लाख रुपयांचा गंडा घातला होता. या सायबर भामट्यांनी 27 मे रोजी एकाच दिवसात 11 बँक खात्यांमधून अनेकांना 13 कोटींचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. यातील 10 खात्यांवर 27 मे रोजी तब्बल 13 कोटी रुपये झाले. ही सर्व रक्कम भामट्यांनी इतर खात्यांमध्ये वर्ग केली आहे. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम देशातील चेन्नई, जयपूर, मुंबई, पुणे, पंजाब, आसाम, ओडीसा यासह विविध राज्यातील 12 बँकांच्या वेगवेगळ्या 39 खात्यांमध्ये रक्कम पाठवल्याचे दिसून आले. यानंतर आणखीन 70 बँक खात्यांची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 130 हून अधिक बँक खात्यांची तपासणी करण्यात आली आहे.
- तरुणाची चौकशी सुरु
दरम्यान या फसवणूक प्रकरणाचा तपास करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. या फसवणूकप्रकरणी पिंपरी चिंचवड येथून एका 32 वर्षीय तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार आहे. यापूर्वीही या तरुणावर अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. त्याच्या खात्यावर फसवणुकीनंतर पहिल्या टप्प्यात 42 लाख रुपये वर्ग करण्यात आले. हे पैसे अवघ्या काही मिनिटांमध्ये दुसऱ्या खात्यांवर वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
- 130 खात्यांची पडताळणी
या फसवणुकीसाठी आतापर्यंत 130 खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 12 बँकांमधील 11 खात्यांवर रक्कम वळविण्यात आली. यानंतर वेगवेगळ्या 39 खात्यांमध्ये ही रक्कम पाठवल्याचे दिसून आले. यानंतर आणखीन 70 बँक खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 130 हून अधिक बँक खात्यांची तपासणी करण्यात आली आहे.
- आणखीन तीन संशयीत
फसवणुकीच्या तपासाची व्याप्ती देशभर आहे. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. बँक खात्यांची तपासणी आणी मोबाईल डिटेल्स या आधारे पोलिसांना आणखीन तीन संशयितांची नावे समोर आली आहेत. लवकरच या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे.
- 22 लाख रुपये फ्रिज
फसवणुकीच्या 3 कोटी 57 लाख रुपयांपैकी 22 लाख रुपये फ्रिज करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीतील 6 बँक खात्यांवरुन ही रक्कम फ्रिज करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम डोंगरे यांना परत करण्यात येणार आहे.
- बँकेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग
डोंगरे यांच्या खात्यावर 3 कोटी 57 लाख रुपये आहेत. याची माहिती भामट्यांना कशी मिळाली. याची चौकशी सुरु आहे. यासाठी सायबर पोलिसांचे एक पथक स्वतंत्रपणे तपास करत आहे. बँकेतील कोणी यामध्ये सहभागी आहे काय याचा शोध सुरु आहे.








