कोल्हापूर :
बंद घरातील बेडरुमच्या कपाटाचे लॉक उचकटून चोरट्यांनी 18 तोळे दागिन्यांसह रोख 1 लाख रुपये असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 25 मे ते 31 मे 2025 दरम्यान शनिवार पेठ येथील सोन्या मारुती चौकामध्ये ही घटना घडली. याबाबतची फिर्याद शुभांगी सुजय म्हेत्रे (वय 50 रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ ) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभांगी म्हेत्रे पती, आणि मुलगीसह सोन्या मारुती चौक येथील पद्माराजे गल्लीमध्ये राहतात. त्यांचा कॉफी शॉपचा व्यवसाय असून, पती सुजय म्हेत्रे हे इचलकरंजी एलआयसी कार्यालयात नोकरीस आहेत. 26 मे रोजी म्हेत्रे कुटूंबिय दोन दिवस घर बंद करुन देवदर्शनासाठी गेले होते. याचदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करुन 18 तोळे दागिन्यांसह 1 लाख रुपये लंपास केले. शनिवार (31 मे) रोजी म्हेत्रे कुटूंबीय घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, याद्वारे चोरट्याचा शोध सुरु आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करत आहेत. मध्यवस्थीमध्ये घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
- 18 तोळे दागिने, 1 लाख रोकड
म्हेत्रे यांच्या घराच्या बेडरुममधील ड्रॅावरमध्ये सोने चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड ठेवली होती. यामधील 12 तोळे सोन्याच्या पाटल्या, 4 तोळ्याचे सोन्याचे कडे, 2 तोळ्याच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, रोख 1 लाख रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.








