क्रीडा वृत्तसंस्था/ रोझारिओ, अर्जेन्टिना
येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या चौरंगी हॉकी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय महिलांनी उरुग्वेवर पेनल्टी शूटआऊटमदये 3-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी साधली होती.
उपकर्णधार हिनाने 10 व्या मिनिटाला आणि लालरिनपुइने 24 व्या मिनिटाला भारताचे गोल करीत भारताला सामन्यावर नियंत्रण मिळवून दिले. शूटआऊटमध्ये गीता, कनिका व लालाथंतलुआगीने आपल्या पेनल्टीचे गोलात रुपांतर केले. भारताने जोरदार पद्धतीने सामन्याची सुरुवात केली. हिनाने दहाव्याच मिनिटाला भारताचे खाते खोलले. त्यानंतर लालरिनपुइने 24 व्या मिनिटाला त्यात आणखी एका गोलाची भर घातली. भारताने मध्यंतराला 2-0 अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धातील शेवटच्या सत्रात उरुग्वेने भारतावर आक्रमण करीत संधी निर्माण केल्या. इनेस डी पोसाडासने 54 व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी कमी केली. तीन मिनिटानंतर मिलाग्रोस सीगलने आणखी एक गोल करीत भारताशी 2-2 अशी बरोबरी साधली. शूटआऊटमध्ये गीता, कनिका व लालथंतलुआगीने भारताचे गोल केले तर उरुग्वेला फक्त एकच गोल नोंदवता आला. भारताची पुढील लढत यजमान अर्जेन्टिनाशी होणार आहे.









