आंद्रे रुबलेव्ह , पेगुला, ड्रेपर, मॅडिसन कीज यांची आगेकूच, केनिन पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
अमेरिकेच्या कोको गॉफने मेरी बुझकोव्हाचा पराभव करून येथे सुरू असलेल्या प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले. याशिवाय नोव्हॅक जोकोविच, जेनिक सिनर, मॅडिसन कीज, पेगुला, आंद्रे रुबलेव्हृ, जॅक ड्रेपर यांनीही चौथी फेरी गाठली आहे. सोफिया केनिन, व्होन्ड्रूसोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले.
पहिल्या दहा मिनिटांत गॉफने 15 पैकी 10 गुण घेत दणक्यात सुरुवात केली. पहिला सेटही तिने सहज घेतला. पण नंतर बुझकोव्हाने तिला दुसऱ्या सेटमध्ये झुंजवले. गॉफने हा सेट टायब्रेकरवर जिंकत आगेकूच केली. गॉफने ही लढत 6-1, 7-6 (7-3) अशी जिंकली. पहिला सेट तिने अर्ध्या तासात जिंकला. मात्र दुसऱ्या सेटसाठी तिला 75 मिनिटे संघर्ष करावा लागला. 2022 मध्ये गॉफने येथे उपविजेतेपद मिळविले होते. तिला येथे दुसरे मानांकन मिळाले आहे. तिची पुढील लढत 20 व्या मानांकित एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाशी होईल. अमेरिकेच्या एकूण पाच महिला टेनिसपटूंनी चौथी फेरी गाठली असून त्यात जेसिका पेगुला, मॅडिसन कीज, अमांदा अॅनिसिमोव्हा व बिगरमानांकित हेली बाप्टिस्ट यांचा समावेश आहे.
सातव्या मानांकित मॅडिसन कीजने तीन मॅचपॉईंट वाचवत सोफिया केनिनचा 4-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. केनिन ही 2020 ची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आहे. 70 व्या मानांकित हेली बाप्टिस्टशी तिची पुढील लढत होईल. अॅनिसिमोव्हाची पुढील लढत अग्रमानांकित एरीना साबालेन्काशी तर पेगुलाची लढत फ्रान्सच्या लोइस बॉइसनशी होणार आहे. पेगुलाने 2023 ची विम्बल्डन चॅम्पियन मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाचा 3-6, 6-4, 6-2 असा पराबव केला तर बाप्टिस्टने जेसिका बुझास मॅनेरोवर 7-6 (7-4), 6-1 अशी मात केली.
पुरुष एकेरीत सर्बियाच्या जोकोविचने सलग सोळाव्या वेळी चौथी फेरी गाठताना पात्रता फेरीतून आलेल्या फिलिप मिसोलिकवर 6-3, 6-4, 6-2 अशी मात केली. चौथ्या फेरीत त्याची लढत कॅमेरॉन नोरीशी होईल. नोरिसवर जोकोविचने पाचही सामन्यांत विजय मिळविला आहे. अलीकडेच त्याने जिनेव्हा ओपनमध्ये त्याला हरविले होते.
जेनिक सिनरनेही चौथी फेरी गाठताना जिरी लेहेकाचा 6-0, 6-1, 6-2 असा धुव्वा उडवला. त्याचा हा ग्रँडस्लॅममधील सलग 17 वा विजय आहे दीड तासात त्याने हा सामना संपवला. या वर्षातील हा सर्वात लवकर संपलेला सामना आहे. पहिले 11 गेम्स सिनरने जिंकल्याने दुसऱ्या सेटमध्ये परतीचा फटका मारताना तो चुकला आणि लेहेकाला एक गेम जिंकता आहे. लेहेकाने हा गेम जिंकल्यानंतर सेलिब्रेशनही केले. पण हा सेट व पुढचा सेट गमविल्यानंतर त्याचे आव्हान समाप्त झाले. झेकच्या लेहेकाला 34 वे मानांकन मिळाले होते. त्याने एकदा ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरीही गाठली होती. सिनरची पुढील लढत 17 व्या मानांकित आंद्र्रे रुबलेव्हशी होईल. 14 व्या मानांकित ऑर्थर फिल्सने माघार घेतल्याने रुबलेव्हला पुढे चाल मिळाली. अन्य सामन्यात जॅक ड्रेपरने ब्राझीलच्या 18 वर्षीय जोआव फ्रान्सेस्काचा तर इथन किनने टॅलन ग्रीकस्पूरचा पराभव केला.
बोपण्णा-पावलासेकचे आव्हान समाप्त
पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा साथीदार अॅडम पावलासेक यांनी झुंजार लढत दिली. पण त्यांना दुसऱ्या मानांकित हॅरी हेलिओव्हारा व हेन्री पॅटन यांच्याकडून 2-6, 6-7 (5-7) असा तिसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. कनिष्ठ मुलांच्या गटात भारताच्या 17 वर्षीय मानस धामणेला रोनित कर्कीकडून 5-7, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा एन.श्रीराम बालाजी व त्याचा मेक्सिकन साथीदार मिग्वेल रेयेस व्हॅरेला यांचे आव्हानही दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. त्याना चौथ्या मानांकित इटलीच्या सिमोन बोलेली व आंद्रेया वावासोरी यांनी 6-3, 6-4 असे हरविले.









