मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळा अनावरणाची कोनशिला
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील क्लब रोडला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. बी. शंकरानंद यांचे नामकरण व पुतळ्याच्या अनावरणासाठी कोनशिला समारंभ असा संयुक्त कार्यक्रम शनिवारी झाला. क्लब रोडला दिवंगत बी. शंकरानंद यांचे नामकरण करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी झालेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित करून यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली होती. अनेकांच्या मागणीनुसार क्लब रोडला शंकरानंद यांचे नामकरण करण्याचा ठराव झाला. शनिवारी दिवंगत बी. शंकरानंद यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत नामकरण व पुतळा अनावरणासाठी कोनशिला समारंभ झाला.
नामफलक अनावरणप्रसंगी खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बी. शंकरानंद यांनी सातवेळा प्रतिनिधित्व केलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघातून मला खासदार होण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. शंकरानंद यांचा परिचय बेळगाव जिल्ह्यातील खेड्यापाड्यापासून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघ आजही त्यांच्या नावानेच दिल्लीमध्ये ओळखला जातो.
केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, बी. शंकरानंद यांनी बेळगाव जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवले. शंकरानंद हे सुस्वभावी, सरळ मार्गी होते. काही योजना त्यांनी बेळगावसाठी आणल्या. शंकरानंद यांच्यामुळेच माझी राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण झाली. यावेळी आमदार असिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वीणा जोशी, माजी महापौर सविता कांबळे, नगरसेविका सुनीता पाटील, माजी खासदार रमेश कत्ती आदी उपस्थित होते.









