वृत्तसंस्था/ लंडन
वेस्ट इंडिजविऊद्ध टी-20 मालिकेत व्हाईटवॉश साध्य केल्यानंतर इंग्लंडच्या महिला संघाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करत एकदिवसीय सामन्यात आपला वेग कायम ठेवला आहे आणि मालिकेच्या पहिल्या सामन्यात 108 धावांनी दमदार विजय मिळवला आहे.
यजमान संघासाठी महत्त्वाची कामगिरी करणाऱ्यांमध्ये टॅमी ब्युमोंट आणि एमी जोन्स ही सलामीची जोडी राहिली. त्यांनी शानदार शतके झळकावली आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या लिन्सी स्मिथने पाच बळी घेतले. 2019 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सलामीला आलेल्या जोन्सने ब्युमोंटसोबत पहिल्या गड्यासाठी 222 धावा जोडल्या. 98 एकदिवसीय सामने खेळलेल्या या अनुभवी खेळाडूने 121 चेंडूंत 122 धावा करत या प्रकारातील तिचे पहिले शतक झळकावले. तिलाच सामनावीर पुरस्कार प्राप्त झाला.
6 बाद 345 धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी विंडीजला 237 धावांवर रोखण्यात यश मिळविले. डावखुरी फिरकी गोलंदाज लिन्सी स्मिथने यात मोलाचा वाटा उचलला. 36 धावांत 5 बळी घेत स्मिथने एकदिवसीय सामन्यातील कारकिर्दीची सुऊवात उल्लेखनीय पद्धतीने केली. नॅट सायव्हर-ब्रंटच्या नेतृत्वाखालील हा संघ 4 जून रोजी लेस्टर येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करेल.









