बेळगाव : नूतन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारने बेळगाव, मंगळूर पोलीस आयुक्तांसह राज्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. शुक्रवारी लगेच ते सेवेत रुजू झाले आहेत. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना अद्याप स्थळ नियुक्ती दाखवली नाही. 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे भूषण बोरसे यांनी यापूर्वी मंड्या, गुलबर्गा, मंगळूर येथे सेवा बजावली आहे. सध्या सायबर क्राईम आणि नार्कोटिक्स विभागात त्यांची सेवा सुरू होती.
मंड्या जिल्हा पोलीसप्रमुखपदी कार्यरत असताना गुन्हेगारी प्रकरणात जप्त केलेल्या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावण्यासाठी त्यांनी विशेष सॉफ्टवेअर विकसित केले होते. ते मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील राहणारे आहेत. शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांचे आगमन होताच सलामी देण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबरच महिला व मुलांचे संरक्षण व कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावात काम करण्याची इच्छा होती. बेळगाव शांत शहर आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. बेळगावकरांनी यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे. जनस्नेही पोलीस प्रशासनावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









