बेळगाव : श्रीराम कॉलनी, अनगोळ येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून ‘वाईफ इज रिजन फॉर माय डेथ’ अशी चिठ्ठी लिहून त्याने आपले जीवन संपविले आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सुनील अशोक मुलीमनी (वय 33) असे त्याचे नाव आहे. शिवशक्तीनगर येथे एका भाड्याच्या दुकानात तो कॉम्प्युटर रिपेरीचे काम करीत होता. त्याच दुकानात गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच दोरी कापून त्याला सिव्हिलला हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
सुनीलचे वडील अशोक मुलीमनी यांनी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सुनीलने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहिल्यामुळे त्याच्या पत्नीवर एफआयआर दाखल केला आहे. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती समजताच उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सुनीलच्या खिशात सापडलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
40 किलो अमली पदार्थ नष्ट
बेळगाव : जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेले 40 किलो गांजा व इतर अमली पदार्थ दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकारी व जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले. एका कारखान्यातील चिमणीत सर्व अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक व ड्रग्ज डिस्पोजल कमिटीचे सदस्य उपस्थित होते.









