राज्य सरकारचा निर्णय : स्थानिक पातळीवर माहिती देण्यास निर्बंध
बेळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली असल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. बाधित रुग्णांची माहिती स्थानिक पातळीवर देण्यास सरकारने निर्बंध घातले असून राज्यातील रुग्णांची आकडेवारी बुलेटिनच्या माध्यमातून दररोज सायंकाळी प्रसारित केली जाणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात देखील आता कोरोनाने शिरकाव केला असून दररोज विविध ठिकाणी बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून तातडीने सर्व्हे काम हाती घेतले जात आहे.
नातेवाईकांची चाचणी करण्यासह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची देखील तपासणीही केली जात आहे. यावेळचा कोरोना तितकासा धोकादायक नसला तरी नागरिकांनी खबरदारी आणि काळजी घेणे जरुरीचे आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर काही नियमावली सरकारने जारी केल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे. वयोवृद्ध, मधुमेही त्याचबरोबर लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
एखाद्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्फत दिली जात होती. मात्र, आता स्थानिक पातळीवर कोरोनासंबंधीची माहिती दिली जाऊ नये, असे निर्देश राज्य सरकारने जारी केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील कोरोनासंबंधीची माहिती दररोज सायंकाळी माहिती व प्रसार खात्याच्या माध्यमातून दिली जाणार आहे. गुरुवारपासून कोरोना रुग्णासंबंधीचे बुलेटिन आरोग्य खात्याकडून प्रसिद्धीस दिले जात असल्याने यापुढे राज्यभरातील कोरोनाचे अपडेट बुलेटिनच्या माध्यमातून मिळणार आहेत.









