2 जूनपासून सर्व सेवा बंद करण्याचा इशारा : सरकारने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा ठपका : योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी
खानापूर : कर्नाटक राज्य नगरसभा कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात खानापूर नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले असून खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जर शासनाने दि. 2 जूनपर्यंत मागण्यांचा योग्य विचार न केल्यास पाणीपुरवठा विभागही सहभागी होणार असल्याचे खानापूर नगरपंचायत संघटनेचे अध्यक्ष राजू जांबोटी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
कर्नाटक राज्य नगरसभा कर्मचारी संघटनेच्यावतीने नगरपंचायत, नगरसभा, नगरपालिकासह इतर स्थानिक स्वराज्य संस्था सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना के. जी. आयडी सेवेचा लाभ मिळावा, तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर, ट्रॅक्टरचालक, अकाऊंट सेक्शन, पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे तसेच ज्योती संजीवनी या कर्नाटक सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, तसेच 2022 मध्ये कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी वित्त विभागातून वेतन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक सरकारकडे मागणी केली होती. मात्र सरकारने याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याने राज्य नगरसभा कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन शुक्रवारपासून सुरू केले आहे.
खानापूर शहरातील पाणीपुरवठाही होणार बंद
या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शनिवारपासून शहरातील साफसफाई, कचऱ्याची उचल करण्यात येणार नसून दि. 2 जूनपासून शहरातील पाणीपुरवठाही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सेवा ठप्प होणार असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरणार आहे, असे स्पष्ट होत आहे. या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर, खजिनदार संजू काद्रोळी, गंगाधर कांबळे, प्रेमानंद नाईक, तिरुपती राठोड, राजश्री वेर्णेकर, शोभा पत्तार, मोहसीन बडेघर, फकिराप्पा तळवार यासह सर्व विभागाचे जवळपास 85 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, मेघा कुंदरगी, लक्ष्मण मादार यासह शहरातील अनेक नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा व्यक्त केला आहे.









