खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत विविध ठराव संमत
खानापूर : 1 जून 1986 च्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. प्रास्ताविक व स्वागत आबासाहेब दळवी यानी केले. दि. 3 जून रोजी बेळगाव येथे होणाऱ्या म्हादई-कळसा भांडूरा प्रकल्पा विरोधात तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन प्रकल्पाला विरोध दर्शविण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पीक व स्वसंरक्षणार्थ असलेल्या बंदुका निवडणुकी दरम्यान पोलीस स्थानकात जमा करून घेण्यात आलेल्या आहेत. त्या बंदूका अद्याप परत दिलेल्या नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बंदुका परत देण्यात याव्यात, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तालुक्याच्या पश्चिम भागात गिड्डी मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.
अलीकडे झालेल्या मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याचा ठराव करण्यात आला. जांबोटी, कणकुंबी, शिरोली, नेरसा पंचायत भागातील विद्युत पुरवठा वरचेवर खंडित होत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे तसेच मराठी म्हणवून घेणारे काही राष्ट्रीय पक्षातील नेते म. ए. समितीबद्दल अप्प्रचार करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी समिती नेत्यांनी व्यासपीठावर सडेतोड उत्तर द्यावे, संघटना बळकटीसाठी प्रयत्न करावेत, असे ठरविण्यात आले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या हस्ते, अर्बन बँकेचे नूतन चेअरमन अमृत शेलार, विठ्ठल गुरव, बाळासाहेब शेलार यांचा समितीच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश चव्हाण, अॅड. केशव कळेकर, मारुती परमेकर, राजाराम देसाई, नागेश भोसले, रमेश धबाले, पांडूरंग सावंत, गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, अमृत शेलार यांची भाषणे झाली. बैठकीला अजित पाटील, एन. एन. पावले, संजीव पाटील, रविंद्र शिंदे, मऱ्याप्पा पाटील, कृष्णा मन्नोळकर, नारायण पाटील, मोहन गुरव, जयराम देसाई यासह इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.









