बेळगाव : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे खोळंबलेली मशागतीची कामे उरकण्यासाठी बांधांवर शेतकऱ्यांची धांदल पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर बहुतांश ठिकाणी धूळवाफ पेरणीलाही सुरुवात झाली आहे. परिणामी बी-बियाणे आणि रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत आहे. यावर्षी वळीव पावसाने दडी मारल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांना करता आली नाहीत. तशातच गेल्या दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने सतत हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी होण्यासह शेतात चिखल निर्माण झाल्याने पुन्हा मशागतीची कामे खोळंबली होती. पाऊस थांबेल की नाही याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली होती. मशागतीची कामे पूर्ण न झाल्याने तशातच पेरणी करावी का? असा विचार शेतकऱ्यांना करण्याची वेळ आली होती. मात्र आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खोळंबलेली मशागतीची कामे आणि पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यात भात पीक, भुईमूग, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांच्या खरीप पिकांची पेरणी केली जात आहे. त्याचबरोबर सध्या रताळी पिकाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी रताळी काढण्यावर देखील भर देत आहेत. पावसाळ्यात रताळी लावण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे काम सुरू आहे. बेळगाव तालुक्यात विशेष करून मोठ्या प्रमाणात भात पीक घेतले जाते. त्यामुळे बासमती, शुभांगी, इंद्रायणी, अमन, सौभाग्य, साईराम, सोनम, अमानी, वरदान, वाडाकोलम, चिंटू कावेरी, युएस 312, अमोग, एनपी 125, ओमसाई, सुप्रीम सोना, ओम 3, महान, कल्याणी, दप्तरी, बाहुबली, जया, सुंदर, अनोखी आदी प्रकारची भात बियाणे वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पेरणीसाठी आवश्यक रासायनिक खते देखील कृषी खात्याकडून पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पेरणीसाठी आवश्यक हंगाम उपलब्ध झाल्याने बैलजोडी मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी बैलजोडी व माणसाच्या साहाय्याने भाताची पेरणी करताना शिवारात दिसत आहेत. तसेच ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रिलरच्या साहाय्याने खोळंबलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत.









