वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्जेंटिनातील रोझारियो येथे सुरू असलेल्या चार देशांच्या ज्युनियर महिला मैत्रीपूर्ण हॉकी स्पर्धेतील सामन्यात निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर भारताला चिलीविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
भारताकडून सुखवीर कौरने 34 आणि कनिका सिवाचने 47 व्या मिनिटाला गोल केले तर चिलीकडून जॅसिंटा सोलारीने 27 आणि कर्णधार लॉरी मुलरने 42 मिनिटाला गोल केले. दुसऱ्या सत्रात चिलीने गोलची सुरुवात केली. जॅसिंटा सोलारीने 27 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. तिसऱ्या सत्राच्या पाचव्या मिनिटांतच भारताने बरोबरी साधली. सुखवीर कौरनेही पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून ही बरोबरी साधून दिली. 42 व्यामिनिटाला लॉरा मुलरच्या फिल्ड गोलमुळे चिलीने पुन्हा आघाडी घेतली. तथापि, भारताने चौथ्या क्वार्टरची जोरदार सुरुवात केली. कनिका सिवाचने 47 व्या मिनिटाला बरोबरीचा गोल करत गोल नोंदविला. नियमीत वेळेत दोन्ही संघांना विजेता शोधता न आल्याने सामना शूटआऊटमध्ये गेला. जिथे चिलीने 3-1 असा विजय मिळविला चिलीकडून जोसेफिना कॉन्स्टँझा गुटीरेझ, इसाबेल लिओनोर मेसेन आणि त्रिनिदाद अँटोनिया बॅरिओस यांनी गोल केले. तर शूटआऊटमध्ये सोनमने भारताकडून एकमेव गोल केला. भारताचा पुढील सामना 1 जून रोजी उरुग्वेशी होईल.









