पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘शांतता चर्चे’च्या इच्छेवर भारताचे रोखठोक प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईमुळे पाकिस्तानचा सूर बदललेला दिसतो. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलीकडेच भारतासोबत शांतता चर्चेची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भारताने या प्रकरणात सडेतोड उत्तर दिले आहे. इस्लामाबादला कडक संदेश देत भारताने पुन्हा एकदा आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तान जेव्हा सीमापार दहशतवाद थांबवण्यासाठी ठोस पावले उचलेल तेव्हाच त्यांच्याशी चर्चा शक्य होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलीकडेच काश्मीर, दहशतवाद, पाणी आणि व्यापार यासह सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भारतासोबत शांतता चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद आणि संवाद (टेररिझम अँड टॉल्क) एकत्र चालू शकत नाहीत हे आम्ही पुन्हा सांगू इच्छितो, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. भारतासोबत शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी शरीफ यांनी तेहरानमध्ये केलेल्या अलिकडील टिप्पण्यांबद्दल विचारले असता जयस्वाल यांनी हे स्पष्ट केले.
पीओकेवरही भारताची स्पष्ट भूमिका
भारत पाकिस्तानशी फक्त पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि दहशतवाद सोपवण्याच्या मुद्द्यावरच बोलेल. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून तो आमच्या ताब्यात निश्चितपणे येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच आम्ही काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला दहशतवाद्यांची एक यादी दिली होती. त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानला भारताच्या स्वाधीन करावे लागेल, असेही जयस्वाल पुढे म्हणाले.









