राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक, पाकिस्तानला इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानविरोधात चालवेलेल्या ‘सिंदूर’ अभियानात भारताच्या नौदलाने अतुलनीय कामगिरीचे दर्शन घडविले आहे. नौदलामुळे पाकिस्तानला भारताविरोधात तिसरी आघाडी उघडता आली नाही. परिणामी त्याची मोठी कोंडी झाली, अशी प्रशंसा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. त्यांनी शुक्रवारी भारताच्या स्वदेशनिर्मित ‘विक्रांत’ या विमानवाहू नौकेला भेट दिली. सध्याच्या काळात ही युद्धनौका अरबी समुद्रात नियुक्त करण्यात आली आहे.
सिंदूर अभियानाच्या विविध पैलूंवर यावेळी राजनाथसिंह यांनी अधिक प्रकाश टाकला. भारताच्या नौदलाने आपला प्रभाव या अभियानात निर्विवादपणे दाखविला आहे. भारतीय नौदलाच्या अरबी समुद्रातील उपस्थितीमुळे पाकिस्तानला आपले सर्व नौदल सागरतटाच्या प्रदेशातच थांबवावे लागले. त्यामुळे त्या देशाला भारतावर सागरी हल्ले करता आले नाहीत. तसे करण्याचा प्रयत्न त्या देशाने केला असता तर नौदलाने पाकिस्तानच्या सागरी शक्तीची दुर्दशा केली असती. ही कल्पना आल्यानेच पाकिस्तानने संघर्ष वाढविला नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पाकिस्तानची अनेकदा विनंती
भारताने पाकिस्तानला या संघर्षात अनेक दणके दिले. पाकिस्तानचे लष्करी बळ खिळखिळे केले. भारत आपल्याच्याने आटपत नाही, हे लक्षात येताच पाकिस्तानने भारताला शस्त्रसंधी करण्याची विनंती केली. संघर्षाला प्रारंभ झाल्यानंतरच्या तीन दिवसात पाकिस्तानकडून भारताकडे शस्त्रसंधीचे अनेक प्रस्ताव आले होते. अखेर, भारताने शस्त्रसंधी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.
दहशतवादाचा खेळ संपला
दहशतवादाची भीती दाखवून भारताला सौम्य भूमिका घेण्यास भाग पाडण्याचे दिवस आता संपले आहेत, हे पाकिस्तानने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. दहशतवादाची मस्ती आता आम्ही चालू देणार नाही, हे सिंदूर अभियानातून स्पष्ट झाले आहे. यापुढे पाकिस्तानने दहशतवादाचा आधार घेऊन भारताचे रक्त सांडले, तर मात्र पाकिस्तानला त्याची जबर किंमत मोजावी लागेल आणि पराभवाला तोंड द्यावे लागेल, असा स्पष्ट इशारा राजनाथसिंह यांनी आपल्या भाषणात दिला.
दहशतवाद्यांना सोपवा
29 नोव्हेंबर 2008 या दिवशी पाकिस्तानातील दशहतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. या हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार आजही पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानने त्यांना भारताच्या आधीन केले पाहिजे. आम्ही पाकिस्तानला अशा दहशतवाद्यांची सूची पाठविली आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिझ सईद याचे नाव अग्रक्रमाने आहे. पाकिस्तानला शांतता हवी असेल तर त्याने भारताची ही मागणी त्वरित मान्य करून त्याप्रमाणे कृती करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.









