सातारा :
गेल्या 10 दिवसांपूर्वी सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपासून जिह्यात चांगलीच उघडिप दिली आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब आहे. गुरुवारी दिवसभर खडखडीत काही ठिकाणी ऊन पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु होती ती म्हणजे गड्या खडवं पडलंय उरकं शेतीचं कामं, अशी. त्यातच पेरणीसाठी वापसा काही ठिकाणी तयार झाल्याने मशागतीसाठी लगबग पहायला मिळत आहे. तर काहींची इतर कामे शेतात सुरु होती. गुरुवारी सकाळी 9 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या अहवालात पाटणमध्ये 11.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मे महिना म्हटल्यावर शेतातल्या कामाची गडबड असते. शेतात खते टाकणे, नागरंट करणे, भात वापसा तयार करणे, रान तयार करणे, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाने सलग आठ दिवस तुफान बॅटींग केली. अगदी शेतात पाणी पाणी करुन टाकले होते. अति पावसाच्या भागासह दुष्काळी तालुक्यांनाही चांगलेच झोपडून काढले. शेतामध्येही तळे निर्माण झाल्याने असाच पाऊस सुरु राहिला तर यावर्षी ओला दुष्काळ पडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिह्यात उघडीप दिली गेली. पावसाचे प्रमाण कमी झाले. शेतीला पेरणीयोग्य वापसा तयार होण्याची चिन्हे निर्माण होवू लागली. शेतात साठलेले पाणी निघून गेले. पेरणी योग्य शेती करण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा अवकाळीच्या संकटानंतर कंबर कसून तयार झाला. काही ठिकाणी दोन दिवसांच्या उघडीपीने वापसा येवू लागला असून तेथे मशागतीच्या कामांना सुरुवात झाली.
काही ठिकाणी ट्रॅक्टरांची घरघर ऐकू येवू लागली. कारण बैलांची संख्या गावोगावी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे यांत्रिकी शेतीला महत्व येवू लागले आहे. उघडीपीमुळे जिह्यात शेती कामांना वेग आलेला आहे. दि. 29 रोजी सकाळी 9 वाजता पावसाचा अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये सातारा 0.1, जावली 0.8, पाटण 11.8, कराड 2.8, कोरेगाव 9.4, खटाव 0.0, माण 0.0, फलटण 0.6, खंडाळा 4.9, वाई 6.3, महाबळेश्वर 5.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.
- खते बियाणांच्या दुकानात गर्दी
पावसाने उघडीप दिल्याने पेरणी करण्यासाठी सातारा जिह्यातील शेतकरी बांधव खते, बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. तर शेतकऱ्यांनी तयार ठेवलेल्या बियाणांचा वापर केला जात आहे.
..








