बुध :
जांब (ता. खटाव) येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय 40) यांचे शेतात काम करत असताना विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ यांच्या शेरी नावाच्या शिवारात विहिरीचे बांधकाम सुरू आहे. गेली चार दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने काम ठप्प होते. रविवारी सकाळी शेतात फिरून येतो असे सांगून सोमनाथ घराबाहेर पडले ते संध्याकाळ झाली तरी घरी परतले नाहीत. दिवसभर पाऊस सुरू असल्याने व त्यांचा फोनही लागत नसल्याने काळजीपोटी सोमनाथ यांची आई उषा व पत्नी वनिता शिवारात शेजारच्या शेतकऱ्यांकडे फोनवरून चौकशी करू लागल्या. त्याचवेळी विकास सेवा सोसायटीचे सचिव व त्यांचे चुलत भाऊ रणजीत शिंदे यांना सोमनाथ विहिरीच्या बाजूला विजेचा धक्का लागून बेशुद्ध अवस्थेत पडल्याची घटनास्थळावरून माहिती मिळाली.
रणजित यांनी जोडीला गावातील शेतकरी घेऊन घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनेची रितसर माहिती दिली. सोमनाथ यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने जाग्यावरच मृत्यू झाल्याचे आढळून आले. पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी घटनेची रितसर करून पुढील तपास सुरू केला आहे.
शेतात विहिरीच्या बांधकामांचे काम सलग चार दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने अपूर्ण अवस्थेत राहिले होते. शेतात विहिरीवर जाऊन बघून येतो असे सांगून शेतात गेलेले सोमनाथ आजूबाजूला पडलेले साहित्य गोळा करत होते. यावेळी त्यांचा विजेच्या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
सोमनाथ लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे शिवारातच बैलाने मारल्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आई उषा यांनी सोमनाथला हाताशी धरून संसार पुन्हा जोमाने उभा केला होता. सोमनाथ यांनी लहान वयातच घरची जबाबदारी घेतली व यशस्वीपणे पेलली होती. शेतात त्यांनी बरीच प्रगती केली होती. हळूहळू सोमनाथ यांनी गावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात देखील हिरीरीने सहभाग घेऊ लागले. पत्नी वनिता यांना सरपंचपदी विराजमान करत स्वत:च्या नेतृत्व गुणांची त्यांनी चुणूक दाखवली होती. सोमनाथ यांच्या रुपाने कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अकाली निधन झाल्याने व कुटुंब उघड्यावर पडल्याने कुटुंबाबरोबरच गावावरही शोककळा पसरली आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी घटनेची रितसर करून पुढील तपास सुरू केला आहे.
..








