कोल्हापूर / सुधाकर काशीद :
तरुण पोरं क्रिकेटखेळणार, सहलीला जाणार, रस्सा मंडळावर ताव मारणा.., कारण हे त्यांचे वयच आहे. मग ज्येष्ठ मंडळी, निवृत्त आजोबा, बाबा , काका, मामा यांनी काय कट्ट्यावर बसून फक्त बघतंच बसायचं? अजिबात नाही. कोल्हापुरातील उत्तरेश्वर वाघाच्या तालमीने नातवापासून आजोबांपर्यंत सर्वांना सहभागी करून घेत एक आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा भरवली आहे आणि उत्तरेश्वर वाघाची तालमीसमोरच्या चौकात ही आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा रोज रोज रात्री रंगत आहे. पावसामुळे गेल्या दोन–चार दिवसांत स्पर्धा थोडी मागे–पुढे झाली आहे. पण आजपासून पुन्हा स्पर्धा रंगू लागली आहे. या स्पर्धेत तरुणांची चौफेर फटकेबाजी तर आहेच. पण उत्तरेश्वर वाघाच्या तालमीचे पाणी अंगात मुरलेल्या आजोबा, बाबा, काकांचा घुट्टा शॉट अजून कसा दणकेबाज आहे, हेही पाहायला मिळत आहे.
पोरांच्या फटकेबाजी बरोबरच आजोबा, काका, बापू, दादा ही ज्येष्ठ मंडळी स्पर्धेत शॉट घुमवीत आहेत. रोज रात्री 9 ते 11 या वेळेत ही स्पर्धा सुरू आहे. पावसामुळे थोडा अडथळा आला होता, पण पुन्हा ही स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने वाघाच्या तालीम परिसरातील सर्वांनी अंग झटकून खेळात सहभागी व्हावे, हा तर हेतू आहेच. पण त्याहीपेक्षा रोज तीन तास चालणाऱ्या या स्पर्धेमुळे निदान त्या काळात तरी पोरांच्या हातातला मोबाईल बाजूला रहावा, हा या स्पर्धेमागचा एक वेगळा हेतू आहे.
रॉबिया चषक असे या स्पर्धेचे नाव आहे. स्पर्धेत सात संघ सहभागी आहेत. प्रत्येक संघात नऊ खेळाडूंचा समावेश आहे. सहापैकी चार संघ तरुणांचे आणि दोन संघ आजोबा, काका, दादा, मामा, अशा ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजेच निवृत्त झालेल्या मंडळींचे आहेत. स्पर्धा सात ओव्हरची आहे. स्पर्धेचे बक्षीस 11 हजार रुपये आणि ट्रॉफी आहे. स्पर्धेतील सातही संघांना वेगवेगळे किट देण्यात आले आहे. तालमीसमोर विद्युत झोतात ही स्पर्धा खेळवली जात आहे आणि या स्पर्धेची बहारदार रनिंग कॉमेंट्री आहे. आपले आजोबा, मामा, काका, दादा, वडील, क्रिकेट कसे खेळतात, हे पाहण्याची उत्सुकताही मोठी आहे. त्यामुळे ही स्पर्धा पहायला चांगलीच गर्दी आहे.
ही स्पर्धा तीन पिढ्यांतील आणि रात्री तालमीच्या कट्ट्यावर मोबाईलमध्ये डोके घालून बसणाऱ्यांना मोबाईल मधून दोन–तीन तास बाहेर काढणारी आहे. कारण या स्पर्धेत खेळत राहील, पण घुट्टा शॉट मारणारे आपले आजोबा, वडील, काका, दादा क्रिकेट कसे खेळतात, शॉट कसे घुमवतात, हे देखील नवीन पिढीला पहायला मिळत आहे. त्यामुळे या स्पर्धेला चांगला प्रतिसाद आहे.
वाघाच्या तालमीचे वैशिष्ट्या असे, की स्वातंत्र्य चळवळीपासून या तालमीच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे. कोल्हापुरातील सर्व चळवळीत कार्यकर्ते सक्रिय आहेत.
कोल्हापूर शहराचा अपुरा पाणीपुरवठा खराब रस्ते या विरोधात महापालिकेवर गाढव मोर्चा याच परिसरातील नागरिकांनी काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. हा पुराच्या काळात या पेठेतील अनेक घरे पाण्यात बुडतात, सारे जनजीवन विस्कळीत होते, अशा काळात या तालमीनेच पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम ही तालीम सातत्याने करत आहे.
ही तालीम म्हणजे 30-40 वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. याच तालमीच्या परिसरास न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडे यांचा सहवास लाभला आहे. त्यांच्या नावाची शाळा उत्तरेश्वर वाघाच्या तालमीसमोर आहे. अलीकडच्या काळात तर देवदेवतांच्या चांदीच्या मूर्ती याच परिसरातील कारागीर घडवत आहेत. देव घडवणारा परिसर म्हणूनही देशभरात या तालमीचे नाव आहे. ‘अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान’ हे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात असलेले भजन याच तालमीचे आहे आणि तालमीच्या भजन मंडळास चित्रपटातही स्थान मिळाले आहे. काहीतरी हटके उपक्रम राबवणारी तालीम म्हणूनही शहरात ओळख मिळाली आहे.
- उत्तरेश्वरची वेगळीच ओळख
कोल्हापूरची ओळख सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या अंगाने आहे. त्याहीपेक्षा वेगळी वैशिष्ट्यो पेठा–पेठांत दडलेली आहेत आणि ही दडलेली वैशिष्ट्यो काही ना काही निमित्ताने पुन्हा नव्या पिढीसमोर येत आहेत.
- मोबाईलपासून तीन तास लांब
तरुण पिढी मोबाईलमध्ये डोके घालून बसलेली असते. तालमीच्या कट्ट्यावर अशा तरुणांची रांगच असते. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे निदान या स्पर्धेमुळे तरुण पिढी रात्री तीन तास तरी मोबाईलपासून लांब रहावी. यासाठीच ही स्पर्धा आहे.
- संयोजन कमिटी
अनिकेत भोसले, अजिंक्य शिद्रुक, गौरव चव्हाण, मुकुंद गिरी, प्रेम केळावकर, यश चव्हाण, निखिल कदम, ओमकार तवणकर, विपुल साळुंखे, अमर मकानदार हे स्पर्धेचे संयोजक आहेत.








