गोकुळच्या चेअरमन पदावरुन गेली वीस दिवस राजकीयनाट्य रंगलंय
कोल्हापूर : गोकुळच्या चेअरमन पदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांची निवड झाल्याची चर्चा गुरुवारी रात्री उशिरा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली. तशा आशयाच्या पोस्टही मंत्री मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. मात्र चेअरमनपदी नाव निश्चित झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
गोकुळच्या चेअरमन पदावरुन गेली वीस दिवस राजकीयनाट्य रंगले आहे. चेअरमन पदाचा कार्यकाळ संपत आल्यानंतर अरुण डोंगळे यांनी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार चेअरमनपदाचा राजीनामा न देण्याची भूमिका घेतली. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी वरीष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर डोंगळे यांचा राजीनामा मान्य झाला.
यानंतर गोकुळ चेअरमन पदी सर्वमान्य चेहरा देणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. त्यानुसार गोकुळच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले स्व. आनंदराव पाटील–चुयेकर यांचे सुपुत्र शशीकांत पाटील–चुयेकर यांचे नाव चर्चेत आले. मात्र चुयेकर हे आमदार सतेज पाटील गटाचे संचालक असल्याने त्यांच्या नावाला अंतर्गत विरोध झाला.
मुंबईवरुन वरीष्ठ नेत्यांचा आदेश आल्यानंतर गुरुवारी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. सुमारे दोन तासाहून अधिककाळ हि बैठक झाली. बैठकीमध्ये चेअरमन पदाचे नाव निश्चित झाले मात्र हे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले. त्यामुळे गोकुळचा नवा चेअरमन कोण याचा सस्पेन्स निर्माण झाला.
नूतन चेअरमनबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात असताना गुरुवारी रात्री उशिरा नविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती.








