कोल्हापूर :
बुधवारपासून पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. यामुळे अकरा दिवसानंतर सूर्यदर्शन झाले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. तर अद्याप 8 बंधारे पाण्याखाली आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तर अधूनमधून वळीव कोसळत होता. 20 मे पासून जिल्ह्यात सलग कोसळधार पाऊस झाला. यामुळे जवळपास अकरा दिवस सूर्यदर्शन झाले नाही. मे महिन्यात प्रथमच इतका मॉन्सूपूर्व झाला. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली. जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली गेले होते.
जोरदार पावसामुळे आंबोली आणि राऊतवाडी धबधबे मे महिन्यातच प्रवाहित झाले. यामुळे धबधबे पाहण्यासाठी गर्दी झाली. मात्र या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. खरीपावर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. त्याप्रमाणे बुधवारपासून काही ठिकाणी शिडकावा वगळता पावसाने उघडीप दिली. उघडीपीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. गुरुवारी रात्री 8 वाजता राजाराम बंधाऱ्यावर 17 फूट इतकी पाणीपातळी होती. तर 8 बंधारे पाण्याखाली होते. पावसाने उसंत घेतल्यामुळे सूर्यदर्शन झाले. गुरुवारी ढगाळ वातावरण होते. पण पाऊस आला नाही. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
- हवेत गारठा आणि धूळही
दोन आठवडे सलग पाऊस पडल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. जमिनीत पाणी मुरले आहे. यामुळे हवेत उष्म्याऐवजी गारठा निर्माण झाला आहे. वातावरणात झालेल्या बदलाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस थांबल्यामुळे धूळ निर्माण झाली आहे. या धूळीमुळे श्वसनाचे विकार उद्भवण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
- बंधारा पाणीपातळी
रुई 44 फूट 4 इंच
इचलकरंजी 39 फूट 6 इंच
तेरवाड 37 फूट 6 इंच
शिरोळ 32 फूट 7 इंच
नृसिंहवाडी 31 फूट 7 इंच








