वाहतूक कोलमडण्याची भीती : बेळगाव-चोर्ला रस्ता बंदचा परिणाम
वार्ताहर/जांबोटी
बैलूर फाटा ते बैलूर गावापर्यंतच्या रस्त्याची पार दुर्दशा झाली असून, खराब रस्त्यामुळे बैलूर, तोराळी गावची बस सेवा कोलमडण्याची भीती वर्तवली जात आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे सद्यस्थितीत बैलूर गावच्या संपर्क रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. बैलूर फाट्यापासून ते सोनारवाडीपर्यंतचा रस्ता सुस्थितीमध्ये असला तरी उर्वरित रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप
या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर नावालाच शिल्लक असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज पसरले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तर या रस्त्याची अक्षरशा वाताहत झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज देखील निर्माण झाल्यामुळे सध्या हा रस्ता वाहतुकीला अयोग्य बनल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
बैलूर, तोराळी बससेवा कोलमडणार
बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे गेल्या चार दिवसापासून चोर्ला रस्त्यावरून बससह अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याने बेळगाव-गोवा आदी ठिकाणाहून येणारी अवजड वाहने तसेच कर्नाटक व कदंबा परिवहन मंडळाच्या बसेस पर्यायी मार्ग म्हणून बैलूर फाटा ते बैलूर-हब्बनहट्टीr या मार्गाचा अवलंब करीत असल्यामुळे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बैलूर रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. खराब रस्त्यामुळे बैलूर, तोराळी, गावची बससेवा कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बैलूर गावाला बैलूर फाटा तसेच हब्बनहट्टी, तोराळी असे दोन संपर्क रस्ते उपलब्ध आहेत. मात्र दोन्ही रस्ते वाहतुकी अयोग्य बनले आहेत.
बैलूर रस्त्यासाठी चार कोटीचा निधी मंजूर
बेळगाव-चोर्ला या मुख्य रस्त्यापासून बैलूर फाटा ते बैलूर गावापर्यंतच्या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून 4 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मागील महिन्यात आमदारांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अद्याप रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. सध्या या भागात मान्सूनच्या पावसाने जोर पकडल्यामुळे रस्त्याच्या कामाला प्रारंभ होण्याची शक्यता कमीच आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बैलूर फाटा ते बैलूर गावापर्यंतच्या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीयोग्य बनवावा व रस्त्याअभावी नागरिकांचे होणारे हाल दूर करावेत अशी मागणी बैलूर ग्रामस्थांमधून होत आहे









