मशागतीची कामेही ठप्प
वार्ताहर/गुंजी
गेल्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अद्याप थांबला नसल्याने शिवारात तुडुंब पाणी भरले आहे. त्यामुळे परिसरात मशागतीची कामेही ठप्प झाल्याने भातपेरणी खोळंबली आहे. गेल्या मंगळवारपासून या परिसरामध्ये दररोज पाऊस पडत असल्याने शेतीतील सर्वच कामे ठप्प झाली आहेत. या परिसरातील बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने कुरीने भातपेरणी करतात. मात्र गेल्या चार-पाच वर्षापासून बैलजोडीने करणारी पेरणी कालवश होत चालली असल्याने बहुतांशी शेतकरी सध्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने भातपेरणी करण्यास अग्रक्रम देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीसह पेरणीची कामे कमी वेळात होत आहेत.
मे महिना अखेरीस या भागातील शेतकरी भातपेरणीस प्रारंभ करतात. पेरणीपूर्व मशागतीसह सर्वच कामे ट्रॅक्टरने होत असल्याने केवळ आठ ते दहा दिवसात पेरणी पूर्ण केली जाते. त्यामुळे मान्सून सुरू होण्यापूर्वी येथील शेतकरी भातपेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत असतात. मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच वेळोवेळी पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची नांगरटच झाली नव्हती. त्यातच पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली नसल्याने या भागातील पेरणी पूर्णपणे खोळंबून राहिली आहे.
पाऊस ओसरण्याच्या प्रतीक्षेत
सध्या येथील शेतकरी पाऊस ओसरण्याची वाट पाहत असले तरी जाणकार शेतकऱ्यांच्या मते यावर्षी यापुढे पेरणी हंगाम येणे कठीणच आहे. कारण आठवडाभर सततच्या पावसामुळे सध्या शिवारात चिखल निर्माण झाली आहे. चार दिवसात पाऊस ओसरला तरी आणि पेरणी हंगाम मिळालाच तर येथील शेतकरी वर्ग भातपेरणी करतील पण तोपर्यंत पुन्हा मान्सून पाऊस सुरू होणार असल्याने भात उगवण होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे यावर्षी येथील शेतकऱ्यांवर रोपलागवड करण्याची वेळ येणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यावर जादा आर्थिक भुर्दंड पडणार असून, मजुरांचीही तीव्र टंचाई भासणार असल्याची चर्चा येथील शेतकऱ्यांतून चर्चिली जात असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
खत-भात बियाणांच्या मागणीत घट
ऐन पेरणी हंगामात सततचा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मनस्थिती दोलायमान झाल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम थेट भातबियाणे आणि खत खरेदीवर झाला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस शेतक्रयांची भातबियाणे आणि खत खरेदीसाठी धांदल उडालेली दिसते. मात्र यावर्षी येथील कृषी बँकेच्या गोदामातून खत विक्री म्हणावी तशी होत नसल्याचे बँकेचे व्यवस्थापक मल्हारी करंबळकर यांनी सांगितले. कृषी खात्यातूनही भात बियाणे मागणी अत्यंत कमी झाली असल्याचे येथील कृषी खात्याकडून सांगण्यात येत आहे. एकूणच पेरणी हंगामाची शाश्वती येथील शेतकऱ्यांना नसल्यानेच सध्या खत आणि भात बियाणे खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.









