भारतीय संघ आता सज्ज झालाय तो इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका अन् त्याचबरोबर नव्या जागतिक कसोटी स्पर्धेसाठी…या चमूचं नेतृत्व सोपविण्यात आलंय ते जसप्रीत बुमराहऐवजी शुभमन गिलकडे. विराट, रोहित अन् अश्विनच्या अनुपस्थितीत संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या या संघाचं नेतृत्व करणं हे सोपं काम नव्हे…
भारतीय संघाचे डॉक्टर नि फिजिओथेरेपीस्ट यांनी जसप्रीत बुमराहला येऊ घातलेल्या इंग्लंड दौऱ्यावरील सर्व पाचही कसोटी सामन्यांत खेळणं शक्य होणार नाही असं जाहीर केल्यानंतर ‘तो’ कर्णधारपदाच्या सिंहासनावर बसणार हे निश्चित होतं…‘त्याच्या’ वाट्याला आलंय ते भारताच्या सर्वांत कमी वयाच्या कर्णधारांच्या यादीत पाचवं स्थान. त्यात समावेश अवघ्या 21 व्या वर्षी देशाचे नेतृत्व सांभाळलेले मन्सूर अली खान पतौडी, सचिन तेंडुलकर (23 व्या वर्षी), कपिल देव (24 व्या वर्षी) अन् रवी शास्त्री (25 व्या वर्षी) या दिग्गजांचा…‘तो’ ठरलाय 1978-79 मोसमानंतर भारताचं कर्णधारपद भूषविण्याचा मान मिळालेला पंजाबचा पहिला खेळाडू…त्यावेळी पाकिस्तान दौऱ्यावर त्या राज्याचे महान डावखुरे फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांना संधी मिळाली होती ती अधिपत्य करण्याची…
खरं तर ‘त्याला’ ‘सेना’ म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपेक्षेप्रमाणं कामगिरी करणं जमलेलं नाहीये. तरी देखील ‘त्याच्या’वर निवड समितीनं विश्वास दाखविलाय. कारण संघ जातोय तो संक्रमणावस्थेतून…भारताचा नवीन कर्णधार अन् दर्जेदार फलंदाज शुभमन गिल…निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी म्हटलंय, ‘गेल्या वर्षभरापासून आमचं त्याच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर बारकाईनं लक्ष होतं. आम्हाला खात्री आहे की, तो संघाला पुढंच नेण्याचा प्रयत्न करेल. गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्यानं खेळणारे विराट कोहली व रोहित शर्मा नसल्यानं फार मोठी पोकळी निर्माण झालीय. भारताचं कर्णधारपद म्हणजे अक्षरश: दबावच. परंतु तो एक अफलातून खेळाडू असल्यामुळं सारं ठीक होण्याची आशा आम्ही बाळगलीय’…
कित्येकांना मात्र शुभमन गिलला कसोटी संघाचा कर्णधार बनविणं योग्य वाटलेलं नाहीये. त्यात समावेश भारताचे व मुंबईचे माजी डावखुरे जलदगती गोलंदाज करसन घावरी यांचा. विशेष म्हणजे 2011 साली गिलच्या दर्जाचं सर्वप्रथम दर्शन घडलं होतं ते घावरी यांनाच. त्यावेळी तो होता केवळ 12 वर्षांचा…करसन घावरींच्या मते, ‘एखाद्या कसोटी संघाचं कर्णधारपद सांभाळणं आणि ‘गुजरात टायटन्स’चं नेतृत्व करणं यात फार मोठा फरक असून त्याला सामोरं जावं लागेल ते प्रचंड दबावाला. खेरीज त्याच्या फलंदाजीवर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नहीये. तो अन् त्याचा संघ यांचं वय कमी असून अनुभव सुद्धा फारसा नाही. या पार्श्वभूमीवर इंग्लंडला त्यांच्या मायभूमीत हरविणं सोपं काम नव्हे’…
अमेरिका व वेस्ट इंडिजनं आयोजित केलेली ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघात शुभमन गिलचा समावेश नव्हता. मात्र त्याला ‘ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह’ म्हणून नेण्यात आलं होतं…असं असलं, तरी कर्णधारपदाचा पाया घालण्यात आला तो तिथंच. संघ भारतात परतल्यानंतर झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर पाच ‘टी-20’ सामने खेळण्यासाठी गेलेल्या चमूचा कर्णधार म्हणून निवड समितीनं जबाबदारी सोपविली ती गिलवर. विशेष म्हणजे तत्कालीन भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील त्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. भारतानं ती मालिका 4-1 अशी जिंकली…
पंजाबमधील फाझिलका इथं राहणाऱ्या गिलला कर्णधार बनविल्यानंतर अनेकांनी संतोष सुद्धा व्यक्त केलाय. समालोचकांच्या मंडळानं चर्चा करताना म्हटलंय की, सध्याचा विचार केल्यास त्या पदासाठी योग्य वाटतोय तो तोच. शुभमन फक्त 25 वर्षांचा असल्यानं आक्रमक देखील आहे. गरज आहे ती निवड समितीनं त्याचा आत्मविश्वास वाढविण्याची. त्यांच्या मते, त्याला रोहित शर्मा व विराट कोहली निवृत्त होण्यापूर्वीच कर्णधार बनविणं योग्य ठरलं असतं…‘गुजरात टायटन्स’चे सीईओ व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सिंग लव्हली म्हणतात की, त्यांच्या संघाचं नेतृत्व शुभमन गिलनं अतिशय चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं त्याला मोठी जबाबदारी देण्यात येईल हे स्पष्ट दिसत होतं…
अन्य एका विश्लेषकानं निवड समितीच्या निर्णयाचं ‘बोल्ड कॉल’ असं वर्णन केलंय. त्यांच्यानुसार, निवड समितीचा त्याच्यावर विश्वास असल्यानंच कर्णधारपद देण्यात आलयं हे निश्चित. शिवाय त्याच्या क्षमतेला आकार देण्याची हीच योग्य वेळ. इंग्लंड दौरा संपल्यानंतरच त्याच्या नेतृत्व गुणांचं योग्य पद्धतीनं विश्लेषण करणं शक्य होईल…दरम्यान, भारताचे महान लेगस्पीनर अनिल कुंबळे यांनी सुद्धा ‘ऑस्ट्रेलियन समर ऑफ क्रिकेट 2025-26’ या चर्चेत बोलताना शुभमन गिल याला कसोटी कर्णधारपद देण्याच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलंय…‘माझ्या मतानुसार, त्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता निश्चितच दडलीय. एक खरं मात्र खरं की, गुजरात टायटन्स व भारतीय क्रिकेट संघ यांची तुलना करणंच चुकीचं. एखाद्या राज्याचं किंवा आयपीएल संघाचं अधिपत्य करताना येणारी आव्हानं आणि भारतीय संघाचा कर्णधार बनल्यानंतर तोंड द्यावा लागणारा दबाव यात आहे फार मोठं अंतर’, कुंबळे यांचं मत. त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा अन् आर. अश्विन यांचं वर्णन भारतीय संघाचे तीन स्तंभ असं केलंय. त्यांच्या अनुपस्थितीत शुभमन आव्हान कसं पेलतो हे लवकरच कळेल. कारण इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका लीड्सवर 20 जूनपासून सुरू होतेय. त्यामुळं घोडामैदान फारसं दूर नाहीये !
कर्णधार म्हणून शुभमनची कामगिरी…
- जुलै, 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका भारतानं जिंकली 4-1 अशी…
- पाच प्रथम श्रेणी सामन्यांत कर्णधार…त्यापैकी एक जिंकला, दोन अनिर्णित, तर दोन गमावले…
- दुलिप करंडक स्पर्धेत 2019-20 च्या हंगामात दोन लढती अनिर्णित, तर 2024-25 मधील एकमेव लढतीत पराभूत…
- 2019 मध्ये झालेल्या भारतीय ‘अ’ संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार. एकमेव लढत जिंकली ती सात गड्यांनी….
- पंजाबचं कर्णधारपद यंदाच्या जानेवारी महिन्यात कर्नाटकविरुद्धच्या रणजी लढतीसाठी चालून आलं. पण एकमेव सामन्यात स्वीकारावा लागला तो पराभव…
- ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलंय 25 वेळा. त्यातील 14 सामने जिंकले, तर 11 गमावले. जिंकण्याची सरासरी 56 टक्के…
मॅचविनर ते कर्णधार…
- 2021-22 च्या मोसमात भविष्यातील कर्णधार म्हणून चर्चा होती ती जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल आणि रिषभ पंत यांच्या नावांची…त्यावेळी शुभमन गिलचं नाव आसपासही नव्हतं. 19 वर्षांखालील संघातून मोठी झेप घेतलेल्या गिलनं ऑस्ट्रेलियात तेव्हाच कुठं कसोटीत पदार्पण केलं होतं…
- 2020-21 मोसमातील त्या दणदणीत कसोटी पदार्पणानंतर पंजाबच्या या फलंदाजाची गाडी पुढील तब्बल आठ मालिकांमध्ये घसरली अन् 17 कसोटी सामन्यांमध्ये फक्त तीन वेळा त्याला काढता आल्या त्या 50 पेक्षा जास्त धावा…
- तरीही संघ व्यवस्थापनाचा त्याला पाठिंबा राहिला तो देशांतर्गत क्रिकेट आणि ‘आयपीएल’मध्ये फॉर्म चांगला राहिल्यानं…2022 च्या अखेरीस व 2023 मध्ये शुभमननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला कलाटणी दिली ती कसोटी क्रिकेटमधून नव्हे, तर एकदिवसीय सामन्यांतून…
- रोहितसोबत सलामीला येण्याकरिता निवड झालेल्या गिलनं 2023 च्या विश्वचषकापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये विलक्षण फॉर्मात येताना पाच शतकं झळकावली. ते विश्वचषकाचं वर्ष असल्यानं कसोटी क्रिकेट मर्यादित होतं, त्याची त्याला मदत झाली…प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेत आजारी झाल्यानं त्याच्या फॉर्मवर परिणाम झाला खरा, परंतु नंतर त्याच्या चार अर्धशतकांनी चित्र पालटून टाकलं…
- गिलची सामना जिंकून देणारा खेळाडू अशी प्रतिमा बनली ती यामुळं. परंतु कसोटीमध्ये सलामीचं स्थान हे त्याच्यासाठी सर्वोत्तम नव्हतं. या पार्श्वभूमीवर त्याला हळूहळू तिसऱ्या क्रमांकावर हलविण्यात आलं अन् अव्वल स्थान पटकावलं ते यशस्वी जैस्वालनं…
- विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा गिलसाठी खराबच राहिल्यानं इंग्लंडविऊद्धची मायदेशातील मालिका ही त्याच्यासाठी शेवटची संधी असू शकते, असं बोललं जाऊ लागलं होतं. दबावाखाली असूनही त्यानं त्यात दोन शतकं नि दोन अर्धशतकं झळकावली. शिवाय त्यानंतर बांगलादेशविऊद्ध आणखी एक शतक आणि न्यूझीलंडविऊद्ध 90 धावांची खेळी…
- निवड समितीचा गिलच्या फलंदाजीवरील विश्वास वाढत चाललेला असताना दैवही त्याच्या मदतीला धावून आलं…त्याचा कर्णधारपदासाठीचा सर्वांत मोठा स्पर्धक रिषभ पंतची अपघातानं जवळजवळ दोन वर्षे हिरावून घेतली…राहुलनं 2022 च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताचं नेतृत्व केलं होतं. परंतु त्याचा कसोटीतील फॉर्म चांगला नव्हता आणि मायदेशातील कसोटी संघात त्याच्यासाठी जागा नव्हती….राहता राहिला बुमराह. 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत त्यानं पर्थमध्ये भारताला विजय मिळवून दिला, पण तंदुरुस्तीच्या समस्यांनी त्याला शर्यतीतून गारद केलं…
फलंदाजीतील क्रमानुसार गिलची कसोटीत कामगिरी…
स्थान डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं अर्धशतकं
सलामीला 29 2 874 128 32.37 2 4
तिसऱ्या क्रमांकावर 30 3 1019 नाबाद 119 37.74 3 3
कर्णधार बनण्यापूर्वीची तुलनात्मक कामगिरी…
खेळाडूचं नाव कसोटी सामने धावा सरासरी शतकं
रोहित शर्मा 43 3047 46.9 8
विराट कोहली 29 1855 49.5 6
शुभमन गिल 32 1893 35.1 5
– राजू प्रभू









