एकंबे :
सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक म्हणून नोकरीला लावतो, असे सांगून सुमारे चार लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या निहाल युनूस पिरजादे याला राहत्या घरातून रहिमतपूर पोलिसांनी पिंपरी (ता. कोरेगाव) येथून अटक केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे-पाटील यांनी मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. रोहित सदाशिव पवार उर्फ सागर पवार व निहाल युनूस पिरजादे यांनी तारगाव येथील तक्रारदारांच्या भाच्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रक्कम स्वीकारली. वास्तविक पवार व पिरजादे यांची सातारा जिल्हा परिषदेत कोणाची ओळख नसल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये रोहित सदाशिव पवार उर्फ सागर पवार याला यापूर्वी अटक केली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून निहाल पीरजादे हा फरार झाला होता. तो आपले अस्तित्व लपून वास्तव्य ठिकठिकाणी वास्तव्य करत होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींची शोध मोहीम हाती घेण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे-पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी निहाल पिरजादे याची शोध मोहीम हाती घेतली होती. दरम्यानच्या काळात पिरजादे हा आपल्या घरी येणार असल्याचे समजल्यानंतर कांडगे पाटील यांनी उपनिरीक्षक जी. बी. केंद्रे, अंमलदार सचिन माने व महेश देशमुख यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना बरोबर घेत सापळा रचला व पिरजादे याला ताब्यात घेतले व अटक केली. निहाल पिरजादे याच्या विरोधात फसवणुकीबाबत पुणे जिल्ह्यातील भोर आणि राजगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पिरजादे याच्या समवेत आणखी कोण कोण आहेत. कोणाचा या फसवणुकीमध्ये काय रोल आहे, याबाबत कसून तपास केला जात आहे.








