अहवाल वरिष्ठांना पाठविला : पाण्याचा निचरा होण्यासाठी केली व्यवस्था
बेळगाव : बेळगाव विमानतळ परिसरात मंगळवारी सुरक्षा तपासणी करण्यात आली. धावपट्टीच्या शेजारील परिसरात कुठेही पाणी थांबू नये, याची काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर धावपट्टीच्या क्षमतेबाबत तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचण्याचे प्रमाण वाढत असते. सध्या बेळगाव शहरासह परिसरात धुवांधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या परिसरात पाणी साचल्यास त्याचा परिणाम विमानसेवेवर होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळाचे संचालक त्यागराज यांनी विमानतळाची पाहणी करून पाण्याच्या व्यवस्थेची माहिती घेतली. त्याचबरोबर मुख्य धावपट्टीची देखील तपासणी करण्यात आली. यावेळी विमानतळाच्या सेफ्टी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अग्निशमन विभागाचे मॉक ड्रिल
आपत्कालिन स्थितीत आग लागण्याची घटना घडल्यास सुरक्षा कशी घ्यावी? यासाठी अग्निशमन विभागाचे मॉक ड्रिल घेण्यात आले. विमानतळावरील अत्याधुनिक क्षमतेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. तसेच विमानाला अपघात झाल्यास धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर घेण्यात येणारी सुरक्षा, याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.









