गगनबावडा :
करूळ घाटात तळकोकणातून कोल्हापूरकडे डोझर मशिन घेऊन येणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतली. यात कंटेनरची केबीन जळून खाक झाली आहे. सुदैवाने कंटेनर चालक बचावला आहे. बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे घाटमार्गातील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी इसुब उंबर शेख (वय 26 रा.वायफळ, ता.जत, जि.सांगली) हा चालक बांदा येथून कोल्हापूरकडे कंटेनरमधून डोझर मशीन घेऊन जात होता. करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येत असताना गगनबावड्याच्या अलीकडे 4 कि.मी. अंतरावरील करुळ घाटातील एका वळणावर आला असता कंटेनरच्या चालकाला केबीनजवळून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. चालकाने तत्काळ कंटेनर थांबवून पाहीले असता चालकाला आग लागल्याचे निदर्शनास आले. काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान चालक व डोझरच्या ऑपरेटरने कंटेनरमधून उड्या घेतल्या. चालकाने वैभववाडी पोलीस ठाण्याचा नंबर उपलब्ध करून त्यांना संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ रस्ता रुंदीकरणाचे काम करणारे आर.बी.वेल्हाळ कंपनीच्या प्रतिनिधींना फोन केला. काही वेळातच कंपनीचा पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला. कंपनीच्या कामगार व स्थानिकांनी पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान वैभववाडी पोलीस व गगनबावडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आग आटोक्यात आल्यानंतर कंटेनरच्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली. दुपारपर्यंत घाटात एकेरी वाहतूक सुरू होती. दुपारनंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. कंटेनरमध्ये असलेले डोझर मशीन सुस्थितीत आहे.
- महिनाभरातील दुसरी घटना
करुळ घाटात 2 मे रोजी अचानक लागलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाली होती. त्यानंतर आज करूळ घाटात महिनाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. या दोन्ही घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.








