कोल्हापूर / संतोष पाटील :
हॅलो, आम्ही क्राईम ब्रँचमधून बोलतोय, तुम्ही आधार कार्डचा गैरवापर केल्याने तुमच्या मोबाईलसह इतर सेवा पुढील दोन तासात बंद होतील. या एका फेक कॉलला प्रतिसाद दिल्यानेच कोल्हापुरातील वयोवृध्द प्राध्यापिकेला आपल्या कष्टाच्या तीन कोटी 57 लाख रुपयांवर पाणी सोडावे लागले. डिजीटल अॅरेस्टची भीती घालत, ऑनलाईन खोटा खटला चालवत सायबर ठगांनी तीन महिन्यात पैसे उकळले. मुळात ‘डिजिटल अॅरेस्ट‘ हा शब्द ऐकायला जरी गंभीर वाटत असला, तरी तो पूर्णपणे खोटा आणि काल्पनिक आहे. भारतात किंवा जगात कोणत्याही कायदेशीर यंत्रणेकडे ‘डिजिटल अॅरेस्ट‘ नावाची कोणतीही प्रक्रिया अस्तित्वातच नाही. अनाहूत भीती आणि सायबर निरक्षरतेमुळेच ठगगिरी वाढत आहे.
साधारण तीन महिन्यांपूर्वी मीना डोंगरे या 75 वर्षीय निवृत्त प्राध्यापिकेला तुमची मोबाईल सेवा पुढील दोन तासांत खंडित होणार असल्याचा कॉल आला. ओके म्हणून त्यांनी विषय सोडून द्यायला हवा होता. मात्र उत्सुकतेपोटी त्यांनी असे कसे काय ? असा प्रतिप्रश्न केला आणि इथेच घात झाला. तुम्ही आधारकार्डचा दुरुपयोग केला आहे, मागील वेळी कुठे वापर केला होता ? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अमुक ठिकाणी वापर केल्याचे सांगितले. जिथे प्रतिसाद मिळतो तिथे सायबर ठगांचे फावते. समोरील व्यक्ती आपल्या जाळ्यात अडकत आहे, हे ओळखले. बोलून गुंतवून ठेवत इतर माहिती काढण्यात माहिर असलेल्य ठगांनी आजीबाईकडून सहज हवी ती माहिती जाणून घेतली.
तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असून त्यातून मनी लॉड्रींगसारखा गंभीर गुन्हा घडला आहे. तुम्ही ताबडतोब मुंबईत माहीमला कोर्टात हजर व्हा, असे फर्मान सोडण्यात आले. यासाठी पोलीस आयुक्तांच्या वेशातील हुबेहुब वाटणाऱ्या ठगाने व्हीडीओ कॉलही केला. कोर्टात हजर राहणार नसाल तर पंधरा मिनिटात स्थानिक पोलीस तुमच्या दारात हजर होतील, तुम्हाला अटक होईल, आणि ही बातमी सर्वत्र प्रसारीत होईल, असे सुनावले. घाबरलेल्या महिलेने ते सांगतील ते करण्यास तयार असल्याचे सांगितले. एव्हाना घरी दोघे वृध्दच असल्याचे ठगांनी हेरले होते. आता सावज ठगांच्या जाळ्यात फसले होते.
दुसऱ्या टप्प्यात व्हिडीओ कॉलव्दारे हुबेहूब असणाऱ्या कोर्टाचा रंगमच दाखवण्यात आला. यामध्ये न्यायाधीश, सरकारी वकील, ऐकणारे लोक, पोलीस अधिकारी सर्वकाही उपस्थित होते. आता तुमचा खटला सुरू होत असल्याचे नकली न्यायाधीशाने सांगितले. त्यांनी केलेल्या गुह्याची माहितीही दिली. तत्पूर्वी वॉटस् अॅपवर प्रचलित असलेल्या गुह्याशी साधर्म असलेली नोटीसही त्यांना पाठवली होती. कोर्टाचा स्टॅम्पसह असण्राया या नोटीसीमुळे शंका घेण्यास वाव नव्हता. या नकली कोर्टातील केसमध्ये वकीलाने अनेकवेळा आरोपीसारखे त्यांना झापलेही. एकूणच रंगमंच पाहून घाबरलेल्या वृध्देला यातून बाहेर पडण्याची क्लृप्तीही ठगांच्या वकीलामार्फत सुचवण्यात आली. तुमच्या खात्यावर किती रक्कम आहे, याची विचारणा करुन ही सर्व रक्कम सरकारी जमा होईल. तुम्ही ही रक्कम अमूक एका खात्यावर आरटीजीएस करा, ज्याचा तुमच्याकडे पुरावा असेल, ही रक्कम दोन दिवसात व्हाईट करुन पुन्हा खात्यावर रितसर भरण्यात येईल, यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल, ते आगावू भरावे लागेल अशा भूलथापा लगावल्या. डिजीटल अॅरेस्टच्या भीतीने घाबरलेल्या वृध्द दाम्पत्यांनी टप्प्या टप्प्याने तीन कोटी 57 लाख रुपयांची रक्कम पाठवली. आपण फसवलो गेलो आहोत हे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता.
- देशभरातील खात्यात रक्कम
पोलिसांच्या माहितीनुसार पाठवलेली रक्कम ही दिल्ली, नोयडा, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश येथील विविध बँक खात्यातील आहे. याचा ट्रेस आऊट होणार असला तरी रक्कम काढून खर्च केली असल्याची शक्यता अधिक असते.
- सावधगिरी हाच उपाय
1 अज्ञात कॉल्स आणि मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
2 वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
3 कॉलर सरकारी अधिकारी किंवा बँक कर्मचारी म्हणवत असेल, तर त्याची ओळख तपासा. थेट संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. .
4 .सरकारी यंत्रणा कधीही व्हॉट्सअॅप, स्काईप किंवा इतर अनधिकृत अॅप्सद्वारे ‘खटला‘ चालवत नाहीत.
5 नियमितपणे पासवर्ड बदलत रहा आणि मजबूत पासवर्ड
6 कुटुंबातील सर्व सदस्यांना, विशेषता वृद्ध आणि कमी तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या व्यक्तींना सायबर फसवणुकीबाबत माहिती द्या.
7. कोणतीही सेवा मोबाईलवरील कॉल किंवा मेसेजवर खंडीत होऊ शकत नाही, आधारकार्ड, गॅस सिलेंडर, सीमकार्ड, लाईट बील, बँकींग सेवा खंडीत होण्याची भिती घातली जाते.
- ‘डिजिटल अॅरेस्ट‘ ही एक काल्पनिक आणि बनावट संकल्पना
भारतात अटक किंवा कायदेशीर कारवाई ही प्रत्यक्षात आणि लेखी नोटीसमार्फत होते. कोणताही खटला फोनवर किंवा व्हिडीओ कॉलद्वारे चालवला जात नाही. जर तुम्हाला खटल्याची किंवा कायदेशीर कारवाईची भीती वाटत असेल, तर वकील किंवा पोलिसांशी संपर्क साधा. संशयास्पद कॉल आल्यास शांत रहा आणि तातडीने कॉल बंद करा. कॉलरशी जास्त बोलणे टाळा.जवळच्या पोलिस स्टेशनला किंवा सायबर क्राइम सेलला संपर्क करा. भारतात सायबर गुह्यांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 1930 डायल करा.







