कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, हुलबत्ते कॉलनी, कपिलेश्वर कॉलनीसह विविध ठिकाणच्या नाले सफाईचे काम सुरू
बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून नाले व गटारींच्या सफाईकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जेसीबी व पोकलॅनच्या साहाय्याने विविध ठिकाणच्या नाल्यांची सफाई सुरू आहे. कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, त्याचबरोबर हुलबत्ते कॉलनी, कपिलेश्वर कॉलनी यासह विविध ठिकाणच्या नाले सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसाने जोरादार हजेरी लावल्याने शहरात अक्षरश: दाणादाण उडाली आहे. वारंवार सूचना करूनदेखील महापालिका अधिकाऱ्यांनी नाले व गटारींच्या सफाईकडे दुर्लक्ष केल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले.
परिणामी पावसाच्या पाण्यासह नाले व गटारीतील सांडपाणी रस्त्यावर पसरण्यासह घरामध्ये देखील शिरले. त्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला. यापूर्वी झालेल्या बांधकाम स्थायी समिती व आरोग्य स्थायी समितीत कच्च्या व पक्क्या नाल्यांची सफाई करावी, अशी सूचना करून देखील अधिकाऱ्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे महापौर मंगेश पवार यांनी मान्सूनपूर्व खबरदारी बैठक बोलावून बांधकाम व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने शहरातील सर्व नाले सफाई करण्यासंदर्भात सूचना केली. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून अधिकारी नाले सफाईच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.
काढलेला गाळही उचलण्यास प्रारंभ
पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण केले जाणार आहे. नाल्यांमधून काढण्यात आलेला केरकचरा यापूर्वी काठावरच टाकण्यात येत होता. मात्र याबाबत नगरसेवकांनी आक्षेप घेत काढलेला गाळ तातडीने भरून नेण्यात यावा, अशी मागणी केल्याने टाकलेला गाळ भरून नेला जात आहे.









