सात मंदिरात होणार पूजा : 101 आचार्य करणार धार्मिक विधी
वृत्तसंस्था/ अयोध्या
राम दरबारासह सात मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या राममंदिरात पुन्हा एकदा मोठा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी झाली होती. आता दुसरी प्राणप्रतिष्ठा 5 जून 2025 रोजी होत आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबारासह परकोटा येथील 7 मंदिरांची प्राणप्रतिष्ठा येत्या गुरुवारी अभिजित मुहूर्तावर गंगा दसऱ्याला पूर्ण होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्राणप्रतिष्ठा महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गंगा दसऱ्याच्या दिवशी सकाळी 11 नंतर स्थिर लग्न आणि अभिजित मुहूर्तावर पूजा सुरू होईल. अयोध्या आणि काशीचे 101 आचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहेत. गंगा दसऱ्यासारख्या पवित्र सणाच्या दिवशी अभिजित मुहूर्तावर राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. 5 जून रोजी प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त 15 मिनिटे शुभ वेळ काढण्यात आली आहे. सकाळी 11:25 ते 11:40 या वेळेत आठही मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठेचा वेळ आणि मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
सलग तीन दिवस धार्मिक विधी
गंगा दसऱ्याच्या दिवशी लोकांच्या मनात युगानुयुगे वाढलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. अयोध्येच्या पवित्र भूमीवर पुन्हा एकदा जय श्री रामचा नारा घुमेल. 3 जून रोजी सकाळी 6:30 वाजता विधी सुरू होणार असून तो जवळपास 12 तास चालेल. त्यानंतर 4 जून रोजी देखील विधी सलग 12 तास चालू राहतील. काशीचे विद्वान पंडित जयप्रकाश 101 वैदिक आचार्यांसह ही प्राणप्रतिष्ठा पूर्ण करणार आहेत. तत्पूर्वी 2 जून रोजी मातृशक्ती जल कलश यात्रा काढली जाणार असून ती जुन्या आरती स्थळापासून सुरू होईल. ही यात्रा श्रीनगरघाट हनुमानगढी दशरथ महालामार्गे राम मंदिराच्या यज्ञमंडपापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली.









