आळसंद :
खानापूर तालुक्यातील वाझर येथील येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दारे खुली करण्यासाठी पाटबंधारे विभागाने चक्क मोठ्या पोकलैंड मशीनचा वापर करून दरवाजे काढून बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी करण्यात यश मिळवले. परतीच्या पावसाला सुरवात होताच साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान दरवाजे बसवले जातात ते दरवाजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढले जातात व मान्सून पावसाच्या सुरवातीला काढून घ्यायचे असतात. परंतु विभागाचा अंदाज चुकल्याने शर्थीचे प्रयत्न करावे लागले
येरळा नदी तसेच संपूर्ण राज्यभर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसाने येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. येरळा नदी दुथडी वाहत आहे. कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातून वाहणारी येरळा नदीपात्र फुल्ल झाले आहे. खानापूर तालुक्यातील बाझर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तुडुंब भरला आहे. पावसाचा अंदाज घेता गेल्या आठवड्यात वरील दोन दरवाजे माणसांच्या साह्याने काढण्यात आले होते. परंतु बाढता पाऊस व भरलेला बंधारा पाहता पाटबंधारे विभागाचा अंदाज चुकला व पाण्याची पातळी अवाक्या बाहेर जाऊ लागल्याने वाझर येथील बांधऱ्याचे दरवाजे काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही तसेच दरवाजे खुले करण्याची मागणी जोर धरू लागल्याने पाटबंधारे विभागाने मोठ्या अथक प्रयत्नाने चक्क जेसीबीने दरवाजे काढले. काही तासांनी दरवाजे काढल्याने येरळा नदीच्या पत्रातील पाण्याने रौद्र रूप धारण केले होते. काही तासांनी बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाला व निकम वस्ती व मगर वस्तीवरील जाणारा रस्ता मोकळा झाला. येरळा नदीवरील वाझर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यावरून अवजड वाहनांना मनाई असतानाही संबंधित विभागाने मोठा पोकलैंड बंधाऱ्यावर चालवल्याने पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
- आणि गावात पाणी शिरण्याची नौबत टळली
बंधाऱ्याची लोखंडी दारे पाणी वाढल्यामुळे बाजूला करणे आव्हानात्मक होते. पोकलैंड मशीनचा सहाय्याने बंधाऱ्यात पाणी बाढत असतानाच काढण्याचा धाडसी निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. ही दारे काढल्यामुळे पाणी पुढे जाण्यास मार्ग मोकळा झाला. पाणी अडकून राहिले असते तर मंगळवारी दुसऱ्या दिवशी बाढलेल्या पाण्यामुळे गावात पाणी शिरून हाहाकार उडाला असता. दारे काढून घेऊनही दिवसभरात पाणी पातळी वाढली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी या धाडसाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले.








