कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वीट व्यावसायिक आर्थिक अडचणीत
वार्ताहर/किणये
मान्सूनपूर्व पावसाचा फटका वीट व्यावसायिकांना बसला आहे. कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे वीट व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. तालुक्याच्या देसूर, नंदीहळळी, राजहंसगड भागात वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या भागातील वीट ही उत्तम दर्जाची असल्यामुळे इथल्या विटेला चांगली मागणी आहे. या भागातील लोकांचा हा प्रमुख व्यवसाय बनलेला आहे. यंदा मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीट भट्ट्यांवरती मान्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे कच्चामाल पूर्णपणे खराब झाला आहे. तसेच भट्टीच्या ठिकाणी पाणी साचल्याने वीटभट्ट्या अर्धवट ठेवण्यात आलेल्या आहेत.
वीट तयार करण्यासाठी कच्चा माल आणून ठेवलेला आहे. तसेच कच्च्या विटा तयार करण्यासाठी काही जणांना कंत्राटही देण्यात आले. 70 टक्के कच्च्या विटा तयार करून झालेल्या होत्या. मात्र यानंतर वीटभट्टी लावण्याच्या कालावधीतच यंदा अवकाळी पाऊस आला. त्यामुळे भट्टी लावण्याचे कामकाज खोळंबले होते. तसेच काही दिवस पावसाने उघडीप दिली. यानंतर वीटभट्टी लावण्याचे नियोजन व्यावसायिकांनी केले. मात्र पुन्हा गेल्या आठ दिवस मान्सूनपूर्व जोरदार पाऊस सुरू झाला असल्यामुळे वीटभट्ट्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. वीट तयार करण्यासाठी पिवळ्या रंगाची माती व्यावसायिकांनी विकत घेतलेली आहे. तसेच त्यासाठी भट्टीसाठी लागणारे जळावू लाकूड, भाताचा भुस्सा आदी आणून ठेवण्यात आले आहे.
मातीही पावसामुळे वाहून गेली
काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. तर उशिरा वीटभट्टी लावण्याचे नियोजन केलेल्यांना मात्र फटका बसला आहे. कारण कच्च्या बनवून ठेवलेल्या विटा पावसामुळे खराब झाल्या आहेत. तसेच उर्वरित वीटभट्ट्या लावण्याचे कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे. तसेच कच्च्या विटा तयार करण्यासाठी आणून ठेवण्यात आलेली मातीही पावसामुळे वाहून गेली आहे. वीटभट्ट्यांच्या जागेवर पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे वीटभट्टी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.









