वृत्तसंस्था/ जम्मू
ऑपरेशन सिंदूरनंतर एकीकडे विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत, तर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने त्यांचे कौतुक केले आहे. या नेत्याने पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला इंदिरा गांधींशी जोडले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींकडून 33 देशांमध्ये 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांना पाठविण्यात आले आहे. मोदींच्या या निर्णयाला काँग्रेस नेते कर्ण सिंह यांनी योग्य ठरविले. 1971 च्या युद्धापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देखील अशाचप्रकारचे पाऊल उचलले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.
भारत सरकारचा निर्णय योग्य
पाकिस्तान दहशतवादाला बळ पुरवत असल्याची जाणीव जगाला करून देण्यासाठी भारत सरकारने उचललेले पाऊल योग्य आहे. यामुळे भारताची एकजूट प्रतिमा समोर येईल. युद्धादरम्यान कुठल्याही देशाने भारताला साथ दिली नव्हती, याचमुळे जागतिक मत निर्माण करणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी सैन्याला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिल्याने हे यश मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचा दर्जा देण्यात यावा
कर्ण सिंह यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीचे समर्थन केले. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा. हीच योग्य वेळ असून यामुळे लोकांच्या आकांक्षा पूर्ण होतील. सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेला योग्यवेळी राज्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर वर्तमान स्थितीत शक्ती उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान विभाजित होत असून हे अत्यंत विचित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधींचे केले स्मरण
कर्ण सिंह यांनी मोदींच्या निर्णयाची तुलना इंदिरा गांधींच्या कार्यकाळाशी केली. बांगलादेश मुक्तिसंग्रामापूर्वी इंदिरा गांधींनी स्वत:च्या मंत्र्यांना याच उद्देशासाठी जगभरात पाठविले होते. मी त्यावेळी जीडीआर, रोमानिया, बुल्गारिया आणि यूगोस्लाविया या देशांमध्ये गेलो होतो.त्यावेळी केवळ मंत्र्यांना पाठविण्यात आले होते, तर आता खासदारांना याच उद्देशासाठी पाठविण्यात येत आहे. सर्वप्रथम हे एक एकीकृत प्रतिमा सादर करते. पाकिस्तान दहशतवादी कारवायांमध्ये किती सामील आहे हे अन्य देशांना सांगण्यास यामुळे मदत होणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले.









