कराड :
तासवडे औद्योगिक वसाहतीत सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. या मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थ जप्तीनंतर संपूर्ण कराड उपविभागातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच उंब्रज व तळबीड पोलिसांना सक्त सूचना देत कारवाई अधिक तीव्र केली आहे.
कराड उपविभागात छुप्या पद्धतीने अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. याचा भांडाफोड होत आहेच, शिवाय पोलीस उपअधीक्षकांना गोपनीय माहित्या मिळत आहेत. या आधारे छापेमारी सुरू करण्यात आली आहे. मात्र कारवाईची माहिती पोलिसांनी गोपनीय ठेवली असून पुढील कारवाईत अडथळा येऊ नये, अशी व्युहरचना असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांचे लक्ष सध्या रेकार्डवरील गुन्हेगार, अवैध व्यवसाय, आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्यांवर केंद्रित आहे. उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागात कारवाई करून त्याचा अहवाल पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
ठाकूर यांनी या आधीही अनेकदा कराड व आजूबाजूच्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत वाहन तपासणीसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. आता पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी यांना वेगवेगळ्या भागात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर देखील पोलीस लक्ष ठेवून आहेत. गुन्हेगारीच्या उदात्तीकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडियावरील हालचालींचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.








