बेळगावातील खासगी महाविद्यालयाकडून मलिदा लाटण्याचा प्रकार अंगलट
बेळगाव : बेळगाव येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून दहा लाखांची लाच घेताना सीबीआयने नॅशनल मेडिकल कमिशनच्या (एनएमसी) एका सिनियर डॉक्टरला अटक केली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली असून सर्वत्र या कारवाईची चर्चा होत आहे. उपलब्ध माहितीनुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रविवारी एका पत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये मूल्यमापन करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरवर अटकेची कारवाई झाली आहे. खासगी मेडिकल कॉलेजकडून अनुकूल असा अहवाल देण्यासाठी दहा लाख रुपये लाच स्वीकारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईनंतर झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये सुमारे 44 लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. 24 मे रोजी वरिष्ठ डॉक्टर, दोघे खासगी व्यक्ती व बेळगाव येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकलेल्या वरिष्ठ डॉक्टरला सीबीआयने अटक केली आहे. या कारवाईत 54 लाख 60 हजार रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.









