भिंतीच्या बांधकामावर आक्षेप : जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
बेळगाव : तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक सुरू असलेल्या भिंतीच्या बांधकामाला स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. भिंतीच्या बाजूने येण्या-जाण्यास असलेला रस्ताही बंद केला जात असल्याने नागरिकांनी जाब विचारला. काम थांबवून रस्ता बंद केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे रेल्वेगेट परिसरात बराच काळ गोंधळ निर्माण झाला. तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक उड्डाण पुलाच्या बांधकामाला विरोध झाल्याने या ठिकाणचे उड्डाण पूल रद्द करण्यात आले. त्यामुळे रेल्वेगेट 10 मार्चपासून कायमस्वरुपी नैर्त्रुत्य रेल्वेने बंद केले. त्यानंतर रेल्वेगेट परिसरात भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. 7 ते 8 फूट उंच भिंत बांधून येण्या जाण्यास काही रस्ता ठेवण्यात आला होता.
तेथून नागरिकांची ये-जा सुरू होती. परंतु सोमवारी हा रस्ताही बंद करण्यात येत असल्याने स्थानिकांनी आक्षेप घेतला. स्थानिक व्यापारी, महिला व पुरुषांनी काम थांबविण्याची मागणी केली. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन काम थांबविण्यात आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी व्यापारी तसेच रहिवाशांच्या सह्या घेऊन येण्या-जाण्यास रस्ता सुरू ठेवावा, अशी मागणी रेल्वे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सांगितले. येत्या आठ दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने कपिलेश्वर उड्डाण पुलावरून वळसा घालून विद्यार्थ्यांना यावे लागणार आहे. त्याऐवजी येथूनच येण्या-जाण्यास जागा उपलब्ध झाली तर ये-जा करणे सोयीचे होईल. त्यामुळे रेल्वेगेट पूर्णपणे बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली.
अंडरग्राऊंड ब्रिजची व्यवस्था करा
रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद केल्याने येथील व्यापाऱ्यांना जोरदार फटका बसला. काहींनी तर दुकानगाळे विक्री करण्यास सुरुवात केली. तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. या ऐवजी दुचाकी तसेच पादचाऱ्यांसाठी अंडरग्राऊंड ब्रीज तयार केल्यास व्यापाऱ्यांनाही फायदा होईल, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली.
रस्ता पूर्णपणे बंद करण्यास विरोध
स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे तानाजी गल्ली रेल्वेगेट उड्डाण पूल रद्द करण्यात आला. परंतु त्यावेळी ये-जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. सोमवारी तानाजी गल्ली रेल्वेगेट परिसरातील रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न झाला. परंतु नागरिकांच्या विनंतीनुसार काम थांबविण्यात आले आहे.
– विनोद भागवत, स्थानिक रहिवासी









